आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत तरुणाची हत्या

औरंगाबाद : क्रांतीचौकात एका तरुणाची दोन भावांनी चाकू भोसकून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली. ही घटना शनिवारी घडली असून, आशिष संजय साळवे असे मृत तरुणाचे नाव आहे. तर अविनाश गौतम जाधव आणि कुणाल गौतम जाधव अशी संशयीत आरोपींची नावे आहेत. ६ महिन्यांपूर्वी एका लग्‍नाच्‍या वरातीत झालेल्‍या भांडणाच्या रागातून ही हत्या झाल्‍याची माहिती मिळत आहे. घटनेनंतर दोन्‍ही आरोपी फरार झाले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी शनिवारी सायंकाळी औरंगाबाद येथील क्रांतीचौकात मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळी अविनाश जाधव आणि कुणाल जाधव या दोन भावंडांनी मिरवणुकीत आलेल्या आशिष साळवेवर पाळत ठेऊन त्याला गुप्तीने भोसकले. आशिषला घाटी रुग्‍णालयात दाखल केले असता, डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. या हत्याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.