युकाँने जाळला मोदींचा पुतळा

दिल्ली : कर्नाटकातील सत्ता संघर्षात सर्वोच्च न्यायालयातून अपेक्षित कौल न मिळाल्याने हताश झालेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी आणि भाजपाविरोधात घोषणा देत, पंतप्रधान मोदींचा प्रतिकात्मक पुतळा जाळला.

सर्वोच्च न्यायालयाने रात्री उशिरा भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांचा शपथविधी रोखण्यास नकार देत याप्रकरणी शुक्रवारी सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांनतर रात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे राजकीय पेच निर्माण झाला आहे. १०४ जागा जिंकणारा भाजपा सर्वांत मोठा पक्ष आहे. पण बहुमतासाठी आवश्यक असणारे ११२ हे संख्याबळ त्याच्याजवळ नाही. दुसरीकडे काँग्रेस (७८) आणि जेडीएस (३७) यांनी आघाडी करत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. पण राज्यपालांनी भाजपाला सत्ता स्थापण्याचे निमंत्रण दिल्याने काँग्रेस आणि जेडीएस हे सर्वोच्च न्यायालयात गेले होते. न्यायालयाने शपथविधी रोखण्यास नकार दिला.