उद्या येडियुरप्पा कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार?

बेंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे संपूर्ण निकाल हाती आले असून, भाजपाला सर्वाधिक १०४ जागा मिळाल्या असल्या, तरी सत्ता स्थापन करण्यासाठी लागणारा ११३ चा आकडा मिळाला नसल्याने भाजपासमोर मोठे आवाहन उभे ठाकले आहे. मात्र भाजपा सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. आज प्रदेश कार्यालायात निवडून आलेल्या पक्षाच्या आमदारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत बी.एस.येडियुरप्पा यांची भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी निवडदेखील करण्यात आली आहे. निवड झाल्यानंतर ते सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांची भेट घेण्यासाठी ते रवानादेखील झाले आहे.

दरम्यान, भाजपाजवळ सत्ता स्थापनेसाठी लागणार संख्याबळ नसले तरी काँग्रेसचे ८, जेडीएसचे ४ आणि अपक्ष १ असे १३ आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी केला आहे. आजच्या बैठकीत याबाबत रणनीती आखल्यानंतर भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झालेले बी.एस.येडियुरप्पा हे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांसोबत राजभवनाकडे रवाना झाले आहे. ते थोड्याच वेळात राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. भाजपाचे संख्याबळ लक्षात घेता राज्यपाल येडियुरप्पा यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करू शकतात. आणि असे झाले तर उद्यालाच कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी शपथ घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.