येडियुरप्पा लवकरच शेतकरी कर्जमाफीची घोषणा करणार

बंगरुळु : कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याच्या काही तासातच बी.एस. येडियुरप्पा यांनी एक महत्वपूर्ण घोषणा करत काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांची चिंता वाढवली आहे. येडियुरप्पा हे लवकरच राज्यातील १ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा करणार आहे. त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेस-जेडीएसच्या काही आमदाराचं मतपरिवर्तन होऊ शकतं आणि ते वेगळा विचार करू शकतात, अशी आशा कदाचित भाजपालावाटत असल्याने भाजपाने ही मोठी खेळी खेळल्याचं बोललं जात आहे. त्यांच्याद्वारे करण्यात येणाऱ्या या घोषणेमुळे आता आपल्या आमदारांना सांभाळण्याचं काम विरोधकांना अडचणीचं होऊन बसलं आहे.

येडियुरप्पांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर थेट विधानसभा गाठून मोदी स्टाईलने सभागृहात प्रवेश घेतला. सत्तास्थापनेबाबत मला आणि पक्षाला संपूर्ण विश्वास आहे. आपलं सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल, असं विश्वासाने म्हणत त्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या विषयाबाबत सरकारची भूमिकाही स्पष्ट केली. आपलं सरकार १ लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ करेल, असं त्यांनी जाहीर केलंय. पुढच्या एक-दोन दिवसांत याबाबतची अधिकृत घोषणाही ते करणार आहेत.

कर्नाटक विधानसभेच्या प्रचारात शेतकऱ्यांचं कर्ज हा प्रमुख मुद्दा उचलून धरण्यात आला होता. काँग्रेसनं त्यावरून थेट मोदी सरकारलाच धारेवर धरलं होतं. परंतु, सरकार स्थापन करण्याआधीच मुख्यमंत्री येडियुरप्पांनी तत्वतः कर्जमाफीची घोषणा केली आहे. स्वाभाविकच, आपलं सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत अत्यंत गंभीर आणि संवेदनशील असल्याचेच संकेत त्यांनी या घोषणेच्या माध्यमातून दिले आहेत. शेतकऱ्यांबद्दल आस्था असलेल्या काँग्रेस-जेडीएसमधील आमदारांना त्यांनी अप्रत्यक्षपणे आपल्याकडे आकर्षित केले आहे.

दुसरीकडे, लिंगायत आमदारांना खेचण्याचे प्रयत्न भाजपाचे नेतेमंडळी करतांना दिसत आहेत. काँग्रेसचे ७८ पैकी २१ आणि जेडीएसचे ३७ पैकी १० आमदार लिंगायत समाजाचे आहेत. त्यातील १० जणांचं जरी मतपरिवर्तन झालं, तरी भाजपाचा सत्तास्थापन करण्यास कुठलीही अडचण होणार नाही. त्यासाठी नेतेमंडळी लिंगायत मठांमध्ये जाऊन भावनिक आवाहन करत आहेत. आणि त्यात ते अपयशी ठरले तर भाजपावर मोठी नामुष्की ओढवण्याची शक्यता आहे.