येडियुरप्पांचा मोदी स्टाईलने विधानसभेत प्रवेश

बंगळुरू : आज शेवटी मोठ्या नाटकीय घडामोडीनंतर भाजपाचे येडियुरप्पा यांनी राजभवनात झालेल्या छोटेखानी समारंभात कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर विधानसभेच्या आत जातांना येडियुरप्पांनी मोदी स्टाईलने केलेला प्रवेशही चांगलाच गाजत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर संसदेच्या पायरीसमोर नतमस्तक होऊन सभागृहात प्रवेश केला होता. येडियुरप्पा यांनी आज मोदींच्या याच कृतीची नक्कल केली. विधानसभेच्या पायऱ्यांवर डोके टेकवून ते सभागृहात गेले. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांच्यासह पक्षाचे अनेक नेते होते.

देवभक्त असलेल्या येडियुरप्पांनी शपथ घेण्यापूर्वी राधा-कृष्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतले. येडियुरप्पा राजभवनात पोहोचले तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी राजभवनाबाहेर मोठ्या आनंदात जल्लोष साजरा केला. ‘मोदी-मोदी’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणा देत आणि ढोल-ताशे वाजवत भाजप कार्यकर्त्यांनी येडियुरप्पा यांचे स्वागत केले. यावेळी असंख्य कार्यकर्ते पारंपारिक वेशभूषेत दिसून आले होते.