हुंड्यासाठी पत्नीला मारहाण; व्हीडीओ सासऱ्याला पाठवला

Dowry

शहाजहाँपूर (उत्तरप्रदेश): शहाजहाँपूर येथे राहणाऱ्या अशोक नावाच्या माणसाने हुंड्यासाठी पत्नीला मारहाण करून त्याचा व्हीडीओ सासऱ्याला पाठवला आणि हुंडा दिला नाही तर अशीच मारहाण सुरू राहील, अशी धमकी दिली.

चार वर्षांपूर्वी पीडित रुचीचं लग्न लखीमपूर येथील अशोकसोबत झालं. लग्नानंतर दुस-या दिवसापासूनच सासरच्यांनी हुंड्यासाठी तिचा छळ सुरू केला, असा आरोप रुचीच्या माहेरच्यांनी केला आहे. एक वर्षापूर्वी रुचीने बाळाला जन्म दिला. यानंतर अशोक वारंवार रुचीला, माहेरी जाऊन ५० हजार आण असे सांगत होता. रुचीने नकार दिल्यानंतर अशोकने तिचे हात बांधून तिला छताला लटकवले आणि काठीने- पट्ट्याने मारले. या मारहाणीचा व्हीडीओ काढून सासऱ्याला पाठवला आणि हुंडा दिला नाही तर अशीच मारहाण सुरू राहील, अशी धमकी दिली.

व्हिडीओ पाहिल्यानंतर रुचीच्या माहेरच्या लोकांना धक्का बसला. ते लगेच मुलीच्या सासरी आले. तिथे रुची बेशुद्द पडली होती आणि तिच्या सासरची मंडळी फरार झाली होती . रुचीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रुचीला काठी आणि नंतर पट्ट्याने जबरदस्त मारहाण करण्यात आली आहे.