बळजबरीने नाणार लादणार नाही : मुख्यमंत्री

नागपूर : नाणारचा प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्प पर्यावरण पूरक असला तरी स्थानिकांशी यावर चर्चा केली जाईल . त्यांचा या प्रकल्पाला विरोध असेल तर, विरोध डावलून प्रकल्प बळजबरीने लादणार नाही अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दिली आहे. प्रकल्पासाठी जबरदस्तीने जमीन अधिग्रहण करणार नाही, असे ते म्हणाले.

या प्रकल्पाशी संबंधित सगळ्यांशी आमची चर्चा करायची तयारी आहे, इतकेच नाही तर आयआयटी मुंबई, निरी सारख्या संस्थांना प्रकल्पाच्या परिणामांचा अभ्यास करण्याचं काम दिलं आहे, विरोधकांशीही चर्चा करण्याची आमची तयारी आहे असं फडणवीस म्हणाले. चर्चा करूनच पुढे जाण्याची आमची भूमिका असल्याचं फडणवीस म्हणाले. समृद्धी महामार्गालाही मोठ्या प्रमाणावर विरोध झाला होता, परंतु चर्चेनं तो प्रश्न सुटला आणि 93 टक्के जमीन सर्वसहमतीने मिळवण्यात सरकार यशस्वी ठरल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. मात्र यानंतरही नाणार प्रकल्पाला शिवसेनेने विरोध केला आहे.

नारायण राणेंनी हा प्रकल्प झाल्यास राजीनाम्याचा इशारा दिला आहे तसेच स्थानिकांनीही या प्रकल्पाला विरोध केला आहे. मात्र आत्तापर्यंत राज्य व केंद्र सरकारची भूमिका हा प्रकल्प होणारच अशी होती. त्यादृष्टीने विविध विदेशी सरकारांशी व कंपन्यांशीही करारही करण्यात आले होते.