कर्नाटकातही आयपीएलप्रमाणे आमदारांची बोली लागणार – यशवंत सिन्हा

नवी दिल्ली : मोठ्या नाटकीय घडामोडीनंतर भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार येडियुरप्पा हे कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र आपले मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करावे लागणार असून सत्ता स्थापनेसाठी आमदारांचे संख्याबळ गाठण्यासाठी आता आयपीएलप्रमाणे आमदारांची बोली लागेल, अशा शब्दांमध्ये भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांनी कर्नाटकमधील राजकीय परिस्थितीवरुन भाजपावर जोरदार प्रहार केला.

कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपाला बहुमत नसतानाही सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिल्यानं सिन्हा यांनी जोरदार टीका केली. ‘राज्यपालांच्या निर्णयामुळे आता आयपीएलप्रमाणे आमदारांच्या बोल्या लागतील. त्यांचा लिलाव होईल,’ असं सिन्हा यांनी म्हटलं आहे.

‘भाजपाकडे सत्ता स्थापनेसाठीपुरेसा संख्याबळ नाही. त्यांना आणखी आठ आमदारांची गरज आहे. अशा परिस्थितीत भाजपा बहुमत कसं काय सिद्ध करणार? दुसऱ्या पक्षातील काही आमदार फोडूनच त्यांना बहुमत सिद्ध करावं लागले,’ असं सिन्हा यांनी स्पष्ट केलं. भाजपाला सत्ता स्थापन करण्याचं निमंत्रण देणाऱ्या राज्यपाल वजुभाई वाला यांच्या भूमिकेबद्दल त्यांनी संशय व्यक्त केला. राज्यपाल एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्यासारखे वागू लागले, तर लोकशाही कशी चालणार?, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी यशवंत सिन्हा यांनी भाजपावर जोरदार टीका केली होती. ‘भाजपा बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यास त्यांच्याकडून निर्लज्जपणे लोकशाही उद्ध्वस्त करण्याचे आणखी प्रयत्न होतील,’ असं भाकीत त्यांनी वर्तवलं होतं. मी पक्षाला सोडचिठ्ठी दिली, याबद्दल अतिशय समाधान वाटतं, असंही ते म्हणाले. ‘लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या पक्षाला मी सोडलं, याचा मला खूप आनंद आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणुकीत बहुमत न मिळाल्यास त्यावेळीही भाजपा असेच प्रयत्न करेल,’ असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.