राष्ट्रगीतासाठी ५२ सेकंद उभे राहायला वेळ का नाही?; अनुपम खेर यांचा सवाल

पुणे: आपण सिनेमाच्या तिकिटासाठी रांगेत थांबतो, मॅचच्या तिकिटासाठी रांगेत थांबतो, हॉटेलमध्ये जागा मिळण्यासाठी थांबतो. मग ५२ सेकंद राष्ट्रगीतासाठी उभे राहू शकत नाही का,’ त्यावर आक्षेप का ? असा परखड सवाल करतानाच त्यातून आपल्यावरील संस्कार दिसून येतात, अशी टिप्पणी प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी रविवारी केली.

मुक्तछंद संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘प्रमोदजी महाजन स्मृती पुरस्कार’ अनुपम खेर आणि तलाक पीडित महिलांसाठी यशस्वी लढा देणाऱ्या शायरा बानो यांना मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार पूनम महाजन, संस्थेच्या अध्यक्ष आमदार मेधा कुलकर्णी, डॉ. नाहीद शेख या वेळी उपस्थित होते. कमोडोर सुरेश पाटणकर यांनी ‘ओआरओपी’च्या माध्यमातूम मिळालेल्या निधीपैकी ७० हजार रुपये या वेळी राज्य सरकारच्या मदत निधीसाठी दिले.

‘आपल्या पासपोर्टवर धर्म नव्हे, तर राष्ट्रीयत्व लिहिलेले असते. मी देशाला माझा मोठा भाऊ मानतो. देशाचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे. माझ्या वडिलांनीच माझ्या मनातून भीती कायमची काढून टाकली आहे. त्यामुळे पुरस्कार परत करणारे मला काय घाबरवणार,’ असे खेर म्हणाले. ‘शायरा बानो यांनी आपल्या लढ्यातून महिलांना बळ व सन्मान दिला,’ असेही ते म्हणाले.

‘मुस्लिम समाजात हजारो वर्षांपासून तलाक, हलाल अशा अनिष्ट प्रथा आहेत. पशू-पक्ष्यांसाठी कायदे आहेत. पण, महिलांसाठी नाहीत. मला तलाक मिळाल्यानंतर मी लढा दिला. कोर्टाने तिहेरी तलाक रद्द ठरवला. परंतु, ही लढाई अजून संपलेली नाही. सध्याचे सरकार याबाबत कायदा करेल, असा मला विश्वास आहे,’ असे शायरा बानो यांनी सांगितले. यावेळी राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले.