नाणार प्रकल्पाविरुद्ध रस्त्यावरही उतरू – राज ठाकरे

मुंबई : कोकणात होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांसह भाजप वगळता इतर पक्षांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. हा प्रकल्प होऊ नये यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी सर्वच पक्षांच्या प्रमुखांशी भेटाघाटी घेण्याचा सपाटा सुरु केला आहे. राष्ट्रवादी कांग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँगेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतल्यानंतर काल ग्रामस्थांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीला प्रकल्पग्रस्थांनी राज ठाकरे यांना प्रकल्पामुळे होणाऱ्या नुकसानीची सविस्तर माहिती दिली.

या भेटीत राज ठाकरे यांनी प्रकल्पग्रस्थांची बाजू ऐकून घेत नाणार प्रकल्पाच्या विरोधात गरज पडल्यास मनसे संपूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरेल असे आश्वासन दिले असल्याची माहिती समोर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरीतील नाणार रिफायनरी प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला आहे. ‘सरकारकडून या प्रकल्पासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला तर मनसे त्याविरोधात रस्त्यावर उतरेल’, असे आश्वासन यावेळी राज ठाकरेंनी नाणारवासीयांना दिलं आहे.