जाणून घ्या ! काय आहे नानार प्रकल्प ?

राजापूर : गेल्या काही दिवसांपासून नानार प्रकल्प आणि त्याला होणारा विरोध या विषयाच्या बातम्या रोजच माध्यमांमधून झळकत आहेत. एकीकडे रोजगाराच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वकांक्षी असल्याचे सरकार कडून सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे कोकणाचे सौंदर्य व मासेमारी व्यवसायासाठी हा प्रकल्प कर्दनकाळ ठरू शकतो म्हणून स्थानीय लोकांचा या प्रकल्पाला विरोध असल्याचे समोर येत आहे. नानार येथे प्रस्तावित असलेला हा ऑइल रिफायनरीचा प्रकल्प नेमका आहे तरी काय हे जाणून घेऊया.

सुमारे दीड लाख कोटी खर्चाची रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल संकुल राजापूर तालुक्‍यातील बाभूळवाडी (वावूळवाडी) येथे उभारण्याचा निर्णय शाशनातर्फे घेण्यात आला आहे. हा प्रकल्प सर्वांत मोठा ठरणार असून दोन ठिकाणी मिळून हा प्रकल्प उभारला जाईल. बाभूळवाडी येथे १४ हजार एकर क्षेत्रात प्रकल्पाचा एक भाग व दुसरा भाग एक हजार एकर क्षेत्रात असेल.

या प्रकल्पाची घोषणा झाल्यापासून गुहागर, दापोली आणि राजापूर येथील ठिकाणांची पाहणी करण्यात आली आहे. या पाहणी दरम्यानच प्रकल्पाला तीनही ठिकाणांहून विरोध झाला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक येऊन दोन महिन्यांपूर्वी पाहणी करून गेले होते. त्यानंतर फारशा हालचाली झाल्या नव्हत्या. आता बाभूळवाडी येथील जागा निश्‍चित करण्यात आली असून ही जागा प्रकल्पाला देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

केंद्र शासनातर्फे इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांनी संयुक्तरीत्या सुमारे साठ दशलक्ष टन प्रती हंगाम क्षमतेचा आणि दीड लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा रिफायनरी प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. प्रकल्पासाठी कोयना धरणापासून पाणी आणण्यात येणार आहे. नाणार परिसरातील सुमारे सात ते आठ गावांतील जमिनीची प्रशासनाने पाहणी केली होती. तेव्हापासूनच प्रकल्पाला विरोध आहे. नाणार, सागवे ग्रामसभांमध्ये प्रकल्पविरोधी ठरावही केले. आता या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे समेत काही राजकीय नेते सुद्धा मैदानात उतरल्यामुळे या प्रकल्पाला राजकीय रंग प्राप्त झाला आहे. तर दुसरीकडे जर या प्रकल्पाला असाच विरोध राहिला तर तो गुजरात कडे वळवण्यात येईल असा सूचक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.