मी भ्रष्टाचाराविरूध्द लढा देणारी कार्यकर्ता आहे : अंजली दमानिया

रावेर : मी गुंड, मवाली नसून भ्रष्टाचाराविरूध्द लढा देणारी सामाजिक कार्यकर्ता आहे. कर्करोगाची रुग्ण असतानाही तब्बल १० तास प्रवास करीत असते. तरीही मुद्दाम दोन-दोन वेळा अजामिनपात्र वॉरंट काढून माझा छळ केला जात आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी रावेर येथे केला.

माजी मंत्री एकनाथ खडसे यांची बदनामी केल्याप्रकरणी माझ्यावर २२ ठिकाणी खटले दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी रावेर न्यायालयाने अंजली दमानिया यांच्या विरुद्ध अटक वॉरंट बजावले होते; हे वॉरंट रद्द करण्यासाठी अंजली दमानिया रावेर न्यायालयात हजर झाल्या असता त्यांनी न्या. डी. जी. मालवीय यांच्यापुढे आपली बाजू मांडली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या हमदस्तच्या आदेशाची प्रतिलिपी पाकीटात न टाकण्याच्या तांत्रिक त्रुटीमुळे उपस्थित न राहण्याबाबत घोळ झाल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. एकनाथ खडसेंनी मंत्रीपदाचा गैरवापर वापर करून संपत्ती गोळा केली त्यांच्याविरूद्ध मी खंबीरपणे लढा देत आहे. मला मुद्दाम दोनदा अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले. कर्करोगाने ग्रस्त असतांना मला मानसिक व शारीरिकदृष्ट्या छळले जात आहे, असे अंजली दमानिया यांनी सांगितले.

त्यांनतर रावेर न्यायालयाने फियार्दी पक्षाचे म्हणणे ऐकून घेत अंजली दमानिया यांचा जामीन मंजूर करीत असल्याचे आदेश पारित केले. अंजली दमानिया यांना ३०० रूपयांचा दंड करून १५ हजारांच्या पीआर बॉण्डवर त्यांची सुटका केली.