विहींप नेते आचार्य धर्मेद्र यांची मोदींच्या कारभारावर टीका

भार्इंदर : विश्व हिंदू परिषदेचे वरिष्ठ नेते आचार्य धर्मेंद्र यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करताना भाजपाच्या ‘घरघर मोदी’ या घोषणेवरून आचार्य धमेंद्र यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. ‘ते घरघर नव्हे तर फरफर मोदी’ असल्याची टीका त्यांनी केली आहे. ते म्हणाले, मोदींनी त्यांच्या कार्यकाळात कोणतेही चांगले काम केले नसल्याचे ते म्हणाले. भार्इंदर पूर्वेकडील जेसलपार्क येथे आयोजित परशुराम जयंतीला उपस्थित राहण्यासाठी आले असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

मोदी सरकारने कायदा केल्यास मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. मात्र असे असतानाही मोदी तसे करत नाहीत. मोदींची सत्ता केंद्रात असतानाही त्यांना राममंदिर बांधता येत नाही, म्हणजे आश्चर्याची बाब असल्याचे ते म्हणाले. ‘मंदिर बांधण्यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करत असतानाही ते दाद देत नाहीत,’ असे आचार्य धर्मेंद्र म्हणाले. ‘यापूर्वी केंद्रात अटलबिहारी वाजपेयींचे सरकार होते. त्यावेळी घरघर अटल कोणी म्हटले नव्हते. यंदा मात्र मोदी आपला वैयक्तिक प्रचार करुन लोकांची फसवणूक करत आहेत,’ असा आरोप त्यांनी केला. यावेळी आचार्य धर्मेंद्र यांनी प्रवीण तोगडियांवरदेखील भाष्य केले. प्रवीण तोगडीया हे स्वार्थी नेते होते. त्यामुळेच त्यांना बाजूला करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर हल्लाबोल करताना आचार्य धर्मेंद्र म्हणाले, गडकरींनी गाईच्या पोटात ३३ कोटीं देवी-देवता असल्यावर संशय व्यक्त केला असल्याने त्यांना हिंदू धर्माची काय माहिती ?, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. सध्याचे नेते त्यांच्या स्वार्थासाठीच काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. भारत सध्या गोमांस निर्यात करणारा देश झाला असून आजही सर्रासपणे गार्इंची हत्या केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. गुजरातमधील निवडणुकीत मोदींसाठी काम केल्याचा दावाही त्यांनी केला.

आसाराम, रामरहिम यांचे नाव घेऊन ते म्हणाले, सध्याचे भोंदू महाराज स्वत:ला संत म्हणवून घेत लोकांची फसवणूक करत आहे. लोकांनी देवतांना मानले पाहिजे, असे आवाहनही आचार्य धर्मेंद्र यांनी केले. आचार्य धर्मेंद्र यांनी महात्मा गांधींच्या राष्ट्रपिता या उपाधीवर आक्षेप घेत त्यांना भगत सिंग यांच्या मृत्यूला जबाबदार ठरवले. जवाहरलाल नेहरु यांच्यामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भारत देश सोडावा लागल्याचा दावाही त्यांनी केला. वादग्रस्त विधाने केल्याने आचार्य धर्मेंद्र यांना गतवर्षी राजस्थान न्यायालयानं १ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. मात्र यानंतरही त्यांची वादग्रस्त विधाने सुरूच आहेत.