विहींप निवडणूक : सर्वोच्च पदासाठी मोदी आणि तोगडिया यांच्यात संघर्ष

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया (विहींप) यांच्यातील विरोध दिल्ली नजिक गरुग्राम येथे आज झालेल्या विहींपच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडणुकीनिमित्त समोर आला आहे.
विश्व हिंदू परिषदेच्या घटनेनुसार आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि रसचिटणीस या पदांवर नेमणूक करण्याचे अधिकार आंतरराष्ट्रीय अध्यक्षाला आहे. मात्र 54 वर्षांच्या विहींपच्या या इतिहासात पहिल्यांदाच या पदासाठी निवडणुका झाल्या. रा. स्व. संघाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले कि, आंतरराष्ट्रीय अध्यक्षाच्या पदाकरीता निवडणुकीच्या निमित्ताने मोदी आणि तोगडिया यांच्यातील आणखी एक लढा समोर आला आहे.

मागील वर्षी डिसेंबरमध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या विहिंपच्या ट्रस्टी आणि कार्यकारी मंडळाची बैठक झाली होती त्यावेळी मोदी यांनी सध्याचे विहींप उपाध्यक्ष आणि माजी सेवानिवृत्त न्यायाधीश व्ही कोकजे यांचे नाव समोर करून सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला होता, असे या पदाधिका-याने नाव न सांगण्याच्या अटीवर एका वृत्तपत्रास सांगितले.

निवडणुकीच्या रिंगणात असलेले सध्याचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष राघव रेड्डी यांची ही तिसरी टर्म असून ते तोगडिया यांचे जवळचे समजले जातात. आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून तोगडिया यांची निवड रेड्डी यांनीच केली होती.
विहींपच्या कार्यकारी मंडळ आणि ट्रस्टी कमेटीचे 260 सदस्य आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणुकीत 200 सदस्यांनी भाग घेतला.

तोगडिया यांनी निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला असून 37 सदस्यांचे नाव नव्याने समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

वरिष्ठ भाजपा नेता आणि माजी रा. स्व. संघाच्या प्रचारकांनी वृत्तपत्राला सांगितले कि तोगडिया यांनी त्यांना देण्यात आलेल्या इशा-याकडे लक्ष दिले नाही. मोदी आणि त्यांच्यात जे काही सुरु आहे त्यात दुरुस्ती करावी यासाठी त्यांना वारंवार सांगण्यात आले. परंतु त्यांनी श्रेष्ठींच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले.

आता त्यांना त्यांच्या पदावरून या निवडणूक प्रक्रियेतूनच हटविण्यात येईल. त्यांचा संघ परिवारात तसेच बाहेर त्यांचा जो काही दबदबा आहे तो संपुष्टात येईल.

संघ परिवाराने मागील चुकांपसून धडे घेतले असल्याचे या नेत्याचे म्हणणे आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी आणि रा. स्व. संघ प्रमुख के सुदर्शन तसेच भारतीय मजदूर संघाचे दत्तोपंत ठेंगडी यांच्यातील संघर्षाची 2004 साली राजकिय किंमत मोजावी लागली होती, असेही हा नेता म्हणाला. आता आम्हाला 2019 मध्ये त्याची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही, असेही त्याचे म्हणणे आहे.

दरम्यान विहींपचे सरचिटणीस चंपत राय यांनी जारी केलेल्या अधिकृत पत्रकात तोगडियांवर तसेच त्यांच्या समर्थकावर आरोप लावताना म्हटले आहे कि, त्यांनी बेबंदशाही माजविली आहे. तोगडिया यांनी आपल्यासोबत काही लोक दिल्ली विहींपच्या कार्यालयात आणले होते. त्यांनी गोंधळ माजविण्याचा तसेच काहींना मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचे या पत्रकात म्हटले आहे.