मुनगंटीवारांच्या भेटीला उद्धव ठाकरेंचा नकार

मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेसोबत युती करण्याच्या भाजपकडून देण्यात येणाऱ्या प्रस्तावाला सध्यातरी ब्रेक लागला आहे. कारण राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी वेळ मागितली होती. मात्र अहमदनगरमधील शिवसैनिकांचे हत्याकांड प्रकरण आणि रत्नागिरीतील नाणार प्रकल्पाच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेटीसाठी नकार दिला असून, ही बैठक लांबवणीवर गेल्याची माहिती समोर आली आहे.

अहमदनगरमधील शिवसैनिकांचे हत्याकांड प्रकरण आणि रत्नागिरीतील नाणार प्रकल्पाला होणा-या विरोधामुळे ठाकरे यांनी ही भेट नाकारण्यात आल्याचे बोलले जात आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी आज संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली होती. मात्र उद्धव ठाकरेंनी भेटीसाठी वेळ देण्यास तूर्तास नकार दिला आहे.

दरम्यान, यापूर्वीच शिवसेनेनं भाजपशी कुठलीही युती करणार नाही, असं जाहीर केलं होतं. तसेच
आगामी सर्व निवडणुका शिवेसना स्वबळावर लढणार आहे. असं उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मेळाव्यातूनच जाहीर केले होते. तर दुसरीकडे केडगाव येथे दोन शिवसैनिकांची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली असून हत्या करणाऱ्यांना जोपर्यंत फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असं शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. शिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा यांच्या संगनमताने शिवसैनिकांची हत्या झाली आहे. असा आरोपही शिंदे यांनी आजच केला आहे.