अन्यथा सरकारचा पाठिंबा काढून घेणार : उद्धव ठाकरे यांचा इशारा

मुंबईः माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मंत्रिमंडळात घेतल्यास सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. पी.ए. मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उद्धव यांनी सकाळी ‘वर्षा’वर निरोप पोहोचवला आहे. हा निरोप मिळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये पुढील डावपेचावर सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याचे समजते.

एकीकडे राणे यांना शिवसेना राजकीयदृष्ट्या संपवित असताना भाजपने त्यांना मंत्री करण्यासाठी सुरू केलेले प्रयत्न शिवसेनेला आवडले नाहीत. याबाबत शिवसेना महिनाभरापासून चुप्पी साधून होती. मुख्यमंत्री फडणवीस हेसुद्धा राणे यांचा मंत्रिमंडळ प्रवेश हमखास असल्याचे जाहीरपणे सांगत होते. यावरून राणे यांना मंत्री करण्यास शिवसेनेचा विरोध नसेल, असे चित्र तयार झाले होते; पण रविवारी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना निरोप पाठवून शिवसेनेची राणे यांच्याविषयीची भूमिका स्पष्ट केली.

कोकणात ताकद वाढविण्यासाठी भाजपने राणे यांना पक्षात घेण्याचे प्रयत्न केले; पण त्यांना मंत्रिमंडळात घेण्यास शिवसेनेचा विरोध होईल, हे ओळखून त्यांना ‘एनडीए’च्या माध्यमातून आपल्या जवळ आणले आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान राणे यांना मंत्री करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच ‘वर्षा’वर निरोप पाटवून उद्धव यांनी भाजपसह मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अपेक्षा भंग केल्या आहे .