नाला ओलांडणाऱ्या दोघांना जलसमाधी

गडचिरोली: गडचिरोलीतील अहेरी तहसीलच्या क्रिष्टापूर आणि निलमगुडम येथील नाल्याला पूल नसल्यामुळे पाण्याच्या प्रवाहातून नाला पार करताना दोघांनी आपला जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे. नागेश मलय्या कावरे (वय २२) रा. कोत्तागुडम व मल्लेश पोचालू भोयर (वय ५५) रा. पुसुकपल्ली अशी नाल्यात वाहून गेलेल्या मृतांची नावे आहेत.

गडचिरोली जिल्ह्याच्या अनेक भागात नदी-नाल्यांवर पूल नाहीत. त्यामुळे नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून पाण्याच्या प्रवाहातून प्रवास करावा लागतो. नेहमीप्रमाणेच गुरुवारी क्रिष्टापूर आणि निलमगुडम येथील नाला पार करताना दोघे बुडाले. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असल्याने नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत.

जीमलगट्टा गावापासून ६ किलोमीटर अंतरावर असलेला किष्टापूर नाल्याला पूर आला आहे. नागेश हा आपल्या भावासह शेतात गेला असता संध्याकाळी गावाकडे परत असतांना दोघेही नाला पार करीत होते. परंतु अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे त्यातून नागेशचा भाऊ कसाबसा बाहेर पडला. मात्र, नागेश पुराच्या पाण्यात वाहून गेला. तसेच नीलमगुडम मध्येही अशाच प्रकारची घटना घडली. मल्लेश भोयर हा संध्याकाळी शेतावरुन गावाकडे परत जात असतांना वाटेतील निलमगुडम नाला पार करू लागला. मात्र, पाण्याचा प्रवाह वाढल्याने ती पाण्यात वाहून गेला. या दोन्ही घटनांची स्थानिकांनी पोलीस व महसूल विभागाला माहिती दिली असून गावकऱ्यांच्या मदतीने दोघांच्याही मृतदेहांचा शोध सुरू आहे. मात्र, मृतदेह अद्याप सापडलेला नाही.