रत्नागिरी : दुचाकी-कंटेनरची धडक, दोघांचा मृत्यू

गिमवी(रत्‍नागिरी) : मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील दिवाण खवटीजवळ दुचाकीला भरधाव कंटेनरने धडक दिली. या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर संतप्‍त गावकर्‍यांनी महामार्ग आडवला असून ३ तासांपासून महामार्गावरील वाहतूक ठप्‍प आहे. विशाल मोरे आणि अरुण वाडकर असे मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विशाल मोरे हे दुचाकी घेऊन कशेडीहून खेडकडे येत होते. त्यांच्यासोबत त्यांचा ८ वर्षांचा भाचा अरुण वाडकर हा देखील पाठीमागे बसला होता. त्यांची दुचाकी ९ वाजण्याच्या सुमारास खवटी रेल्वे स्थानकासमोर आली असता समोरून आलेल्या भरधाव वेगातील कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर खेड पोलिस घटनास्‍थळी दाखल झाले आहेत. या ठिकाणी रस्‍ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. संबंधितांनी योग्य काळजी घेतली नसल्याने हा अपघात झाल्याचा स्‍थानिक नागरिकांचा आरोप आहेत. तसेच, जोपर्यंत महामार्ग व संबंधित कंपनीचे अधिकारी घटनास्थळी येत नाहीत, तोपर्यंत मृतदेहाचा पंचनामा होऊ देणार नाही आणि मृतदेहही ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने पोलीसही हतबल झाले होते.

या घटनेनंतर आमदार संजय कदम हेही घटनास्थळी पोहचले. त्यांनी सांगितल्यानंतरही ठेकेदार घटनास्थळी आला नाही. ठेकेदार बोलावूनही घटनास्थळी न आल्याने संतप्त झालेल्या जमावाने अपघातास कारणीभूत असलेला कंटेनर तसेच महामार्गावरील मोरवंडे-बोरज येथील कंपनीच्या कार्यालयाची मोडतोड केली. यांनतर संतप्‍त गावकर्‍यांनी ४-५ गाड्यांची तोडफोड केली आहे.