‘तुझ्यात जीव रंगला’चं चित्रीकरण झाले बंद

कोल्हापूर : गेल्या एक वर्षापासून कोल्हापूर येथील वसगडे गावात झी मराठी वाहिनीवरील “तुझ्यात जीव रंगला” या मालिकेचे चित्रीकरण सुरु आहे. मात्र, गावकऱ्यांच्या मागणीवरून या मालिकेचे चित्रिकरण बंद करण्यात आले आहे.
गेल्या एक वर्षापासून ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेचे चित्रीकरण सुरू आहे. त्यासाठी मालिकेतील मुख्य कलाकार हार्दिक जोशी, अक्षया देवधर, धनश्री कांडगावकर यांच्यासह अनेक कलाकार वसगडे येथे मुक्काम ठोकून आहेत.

या मालिकेला मिळालेल्या लोकप्रियतेने वसगडे या गावाबद्दल लोकांना माहिती मिळाली. वर्षभर गावात चित्रीकरण सुरळीत सुरू असताना दोन दिवसांपुर्वी सेटवर दररोज मांसाहारी जेवणावळी होत असल्याने मोठ्या संख्येने असलेल्या लिंगायत व जैन समाजातील ग्रामस्थांना त्रास होत असल्याचे कारण देत चित्रीकरण बंद करण्याचे पत्र ग्रामपंचायतीतर्फे मालिकेच्या निर्मिती संस्थेला देण्यात आले आहे.त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून पॅकअॅप करण्यात आले आहे. सध्या या मालिकेचे चित्रीकरण गावाबाहेर केले जात आहे. या सगळ्या वादात आता अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने मध्यस्थी करण्याची तयारी दर्शविली आहे.

मालिकेत दाखवण्यात आलेला गायकवाड वाडा हा गावातील संजय गाठ यांच्या मालकीचा आहे. त्यांच्या शेजारी सुरेश पाटील यांचे घर आहे. मालिकेच्या चित्रीकरणामुळे सतत वाहनांची वर्दळ, मांसाहाराचे जेवण, चित्रीकरणाच्या निमित्ताने होणारा गोंगाट यांचा त्रास होत असल्याची तक्रार पाटील यांनी ग्रामस्थांकडे केली आहे. या तक्रारीची दखल घेत मौजे वसगडे ग्रामपंचायतीतर्फे मालिकेच्या निर्मिती संस्थेला तातडीने चित्रीकरण थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच चित्रीकरण सुरू ठेवल्यास कारवाई करण्याचाही इशारा सरपंच वैशाली पाटील यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.