ट्रक मालकांचे 18 जुलै पासून ‘चक्का जाम’

मुंबई : देशातील ट्रक मालकांनी चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे असून आंदोलनात १८ जूनपासून देशातील माल वाहतूक करणारे सर्व ट्रक बेमुदत काळासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती ऑल इंडिया कॉन्फेडरेशन ऑफ गूड्स व्हेहीकल ओनर्स असोसिएशनने गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. इंधन दर, टोल शुल्क आणि थर्ड पार्टी इन्शुरन्सच्या प्रिमियममध्ये होत असलेल्या भरमसाठ वाढीविरोधात हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

डिझेलचे वाढते दर, टोल शुल्कातील वाढ आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स दराबाबतच्या समस्या तत्काळ सोडवण्याची मागणी केंद्र शासनाला केली आहे मात्र मात्र शासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याने ट्रक ऑपरेटर्सच्या संघटनेला चक्काजाम आंदोलनाचे पाऊल उचलावे लागले असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष बी. चन्ना रेड्डी म्हणाले.

असोसिएशनचे महासचिव राजिंदर सिंग म्हणाले की, डिझेल, टोल आणि थर्ड पार्टी इन्शुरन्सच्या समस्येमुळे ट्रक मालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत सरकारकडे वारंवार मागणी करूनही कोणत्याही प्रकारची ठोस पावले उचलण्यात आली नाहीत. म्हणूनच बराच काळ प्रतीक्षा केल्यानंतर ट्रक चालकांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले आहे.