रेल्वेच्या तिकिटांवर तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय

नवी दिल्ली :सध्या रेल्वे तिकिटासाठी आरक्षण अर्ज भरताना त्यावर पुरुष आणि महिला असे दोन पर्याय सध्या उपलब्ध आहेत. मात्र आता तिकीट आरक्षित करताना आणि ते रद्द करताना भरावा लागणाऱ्या अर्जात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय दिला जाणार आहे. याबद्दलची सूचना रेल्वे बोर्डाकडून सर्व विभागांना देण्यात आली आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय सध्या तृतीयपंथींशी संबंधित अनेक प्रकरणांवर काम करत आहे. शिवाय संसदेच्या स्थायी समितीकडून प्रस्तावित तृतीयपंथी जन विधेयक २०१६ चे परीक्षणही केले जात आहे. १७ ऑक्टोबरला पाठवण्यात आलेल्या पत्रानुसार, सामाजिक न्याय मंत्रालय या विधेयकाला अंतिम रुप देईपर्यंत यात T (M/F)च्या जागी फक्त T चा पर्याय उपलब्ध केला जाऊ शकतो असं स्पष्ट झालं आहे.

२०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तृतीयपंथीयांना दिलासा देणारा निकाल दिला. या निर्णयामुळे महिला आणि पुरुषांसोबतच तृतीयपंथीयांना न्यायालयाने मान्यता दिली. याआधी तृतीयपंथीयांना कोणताही अर्ज भरताना महिला आणि पुरुष यापैकी एक पर्याय निवडावा लागायचा. मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतर पासपोर्ट, शिधावाटप पत्रिका, बँकांचे अर्ज, मतदार ओळखपत्र यांच्यासह अनेक ओळखपत्रकांवर तृतीयपंथीयांना पर्याय दिला जाऊ लागला.

संसदेच्या स्थायी समितीकडून सध्या तृतीयपंथीय हक्क संरक्षण विधेयकाचा आढावा घेतला जात आहे. ‘सामाजिक न्याय मंत्रालयाकडून याबद्दलची सूचना येण्यापूर्वी तिकीट अर्जावर तृतीयपंथींयांसाठी ‘टी’ हा पर्याय देण्यात यावा,’ असे रेल्वे बोर्डाने सर्व विभागांना १७ ऑक्टोबर रोजी लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. रेल्वेच्या सर्व विभागांनी या सूचनेचे पालन करावे, अशी ताकीदही पत्रातून देण्यात आली आहे.