हिंदू हित व शेतक-यांसाठी तोगडिया यांचे 17 एप्रिलपासून बेमुदत उपोषण

नवी दिल्ली : हिंदू हित, काश्मीरी पंडीतांचे पुर्नवसन आणि देशातील शेतक-यांसाठी तोगडिया यांनी येत्या 17 एप्रिलपासून बेमुदत उपोषण करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या समर्थकांना शांत राहण्याचे आवाहनही केले आहे. ते नवीन संघटना स्थापण्याची घोषणा करणार किंवा नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

दरम्यान निवडणुकीनंतर तोगडिया यांनी पत्रपरिषदेत नवीन अध्यक्ष कोकजे यांचे अभिनंदन केले. आपण गेल्या काही दशकांपासून संघटना मजबूत केल्यानंतरही आपल्याला संघटनेबाहेर जावे लागत असल्याचे ते म्हणाले. अयोध्या येथील वादग्रस्त ठिकाणी राम मंदीर बांधण्यात मोदी सरकार काहीही करत नसल्याचा आरोपही तोगडिया यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.

विश्व हिंदू परिषदेच्या निवडणूकीत विहींपचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांना जबर धक्का बसला आहे. तोगडिया यांच्या जवळचे समजले जाणारे राघव रेड्डी पराभूत झाले असून त्यांच्या जागी हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल विष्णु सदाशिव कोकजे हे निवडून आले आहे.

दुसरीकडे तोगडिया यांचे आरोप विहींप नेता सुरेंद्र जैन यांनी फेटाळून लावले आहे. निवडणुका सदस्यांच्या मतानुसार घेण्यात आले असून कुणाचा पराभव करण्यासाठी घेण्यात आल्या नसल्याचे ते म्हणाले. या निवडणुका निष्पक्षपणे पार पडल्याबद्दल प्रत्येकांनी समाधान व्यक्त केले आहे. निवडणुका घेण्याबाबत संघटनेवर कुठलाही दबाव नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.