मुंबईशी नाते जोडायचे असेल तर बिहारींनी मराठी शिकावी – सुशीलकुमार मोदी

मुंबई : मुंबईत रोजगारासाठी आलेल्या बिहारी बांधवांनी येथील मराठी समाजाशी नाते दृढ करण्यासाठी आणि इथल्या मातीशी जुळण्यासाठी मराठी भाषा शिकलीच पाहिजे, असे स्पष्ट मत व्यक्त करत बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते सुशीलकुमार मोदी यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भूमिकेचे समर्थनच केले आहे. बिहार दिनानिमित्त आयोजित समारंभ आणि गुंतवणूक परिषदेसाठी मोदी मुंबईत आले असता त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपले मत व्यक्त केले. त्यांनी दिलेली ही मुलाखत जशीच्या तशी.
प्रश्न : उदरनिर्वाहासाठी मुंबईत राहणारे बिहारी लोक इथल्या समाजाशी एकरूप झालेत असे आपल्याला वाटते का?
मोदी : मुंबईच्या विकासात बिहारी, उत्तर प्रदेशींसह अन्य हिंदी भाषिकांचेही योगदान आहे. बिहारी माणूस मेहनती आहे. पण इथे राहत असताना इथल्या मातीशी त्याने एकरूप झाले पाहिजे, मराठी भाषाही शिकली पाहिजे. संवादाची भाषा एक असेल तर परकेपणा जाणवणार नाही. शिवाय, कटुता वा गैरसमज असतील तर ते दूर होतील.
प्रश्न : मुंबईवरील बिहारींचे अवलंबित्व कमी करू, असे आपले मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले होते. मुंबईतील बिहारी माणसांचे लोंढे कमी करण्यात आपल्याला यश आले आहे का?
मोदी : ते अवलंबित्व पूर्णत: संपविणे शक्य नाही, पण उदरनिर्वाहासाठी मुंबईत येणाऱ्या बिहारींचे प्रमाण आज फारच कमी झाले आहे. आज जे बिहारी इकडे येतात ते चांगला व्यवसाय आणि जीवनमान उंचावण्यासाठी. हा गुणात्मक बदल आज दिसून येतो. मोलमजुरी करणारा बिहारी माणूस मुंबईत खचितच दिसेल.
प्रश्न : मुंबईतील बिहारींंसाठी आपले सरकार काही करतेय का?
मोदी : आमच्या सरकारने बिहार फाऊंडेशनचे कार्यालय मुंबईत सुरू केले आहे. मुंबईत ‘टाटा कॅन्सर’मध्ये उपचारासाठी येणाºया रुग्णास एक लाखाची मदत आमचे सरकार करते. या रुग्णांच्या निवासाची समस्या सुटावी म्हणून एखादी जागा वा इमारत महाराष्ट्र सरकारने द्यावी, अशी विनंती मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. बिहारबाहेर दुर्घटनेत बिहारी व्यक्ती दगावली तर तिच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची मदत तत्काळ दिली जाते.
प्रश्न : बिहार म्हटले की गुंडागर्दी असेच चित्र समोर येते. आपल्या सरकारला हे चित्र कितपत बदलता आले?
मोदी : आजवर बिहारी माणसाला स्वत:ला बिहारी म्हणवून घेण्यात लाज वाटत असे. पण आज अभिमान वाटतो. हा बदल आम्ही करू शकलो. गुन्हेगारीचे प्रमाण तुलनेने फारच कमी झाले आहे. आम्ही विकासाचा अजेंडा राबवित आहोत. बिहारच्या कोणत्याही कोपºयातून पाच तासात राजधानी पाटण्याला पोहोचता येईल असे रस्ते आम्ही बांधले.
प्रश्न : दारूबंदीच्या निर्णयाचा फायदा झाला का?
मोदी : निश्चितच झाला. आमच्या राज्यातील गुन्हेगारी कमी होण्याचे तेही एक कारण आहे. इतर राज्यांनी पण आमच्यासारखी १०० टक्के दारूबंदी करायला हवी. राज्यातील जनतेच्या स्वास्थ्यासमोर दारूपासून मिळणारे उत्पन्न गौण आहे.
प्रश्न :शत्रुघ्न सिन्हांना स्वत:बद्दल गैरसमज
मोदी : यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा हे दोन भाजपा नेते नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सूर आळवण्यात आघाडीवर असतात. याबद्दल आपल्याला काय वाटते, असे विचारले असता मोदी म्हणाले, शत्रुघ्न सिन्हांना स्वत:बद्दल फार मोठे गैरसमज आहेत. आपल्या लोकप्रियतेवर आपण निवडून आलो असे त्यांना वाटते. नरेंद्र मोदींची लाट आणि भाजपाच्या ताकदीमुळे ते लोकसभेवर गेले. कार्यकर्त्यांची नाराजी पत्करून पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. ज्या ताटात खाल्ले त्याच ताटात ते छिद्र करीत आहेत. केंद्रात मंत्रिपद मिळाले नाही म्हणून ते ‘भडास’ काढत आहेत. असा आरोपही त्यांनी शत्रुघ्न सिन्हांवर केला.