सदाभाऊंना बंगला, कार कोणत्या मटक्यातून मिळाली? ‘स्वाभिमानी’चा पलटवार

कोल्हापूर: आपण कोणत्या मटक्यातून अवघ्या दीड एकर शेतीतून भला मोठा बंगला आणि चारचाकी वाहने आणली? असा प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी राज्याचे कृषिराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांना एका पत्रकाद्वारे विचारला आहे. सदाभाऊ खोत यांनी ऊस दराबाबत मटक्याचा आकडा असा टोला लगावल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जोरदार पलटवार करण्यात आला आहे. तुम्ही मटक्यात इतके पारंगत आहात, हे आम्हाला आता समजले, असे उपरोधिक प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

जयसिंगपूर येथे होणाऱ्या ऊस परिषदेच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जाहीर केल्या जाणाऱ्या ऊस दरावर गुरूवारी मंत्री खोत यांनी टिका केली होती. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सचिन नलवडे यांनी सदाभाऊ खोत यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

जयसिंगपूर येथे शेतकरी स्वत:च्या पैशांतून, वेळ खर्च करून येतात, असे तुम्ही जाहीरपणे सांगत होता. याचे तुम्हाला विस्मरण झाले का? आपण रयत क्रांती नावाची संघटना काढली आहे. या संघटनेच्या माध्यमातून आपणही ऊस दराचा आकडा सांगितला असून तो मटक्याचा आकडा आहे का ? असा उपरोधिक प्रश्न नलवडे यांनी उपस्थित केला आहे. गेली १५ वर्षे हेच सदाभाऊ खोत ऊस परिषदेत शासन तसेच कारखानदारांवर टिका करीत होते. त्यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या सल्ल्यानेच उसाचा पहिला हप्ता ठरत होता. मग आताच त्यांना तो मटक्याचा आकडा का वाटत आहे ? असा प्रश्नही नलवडे यांनी उपस्थित केला आहे.

आपली संघटना शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांचीच अधिक असल्याने आपण सोयाबीन, मूग, उडीद विक्रीवेळी शेतकऱ्यांचे हाल होऊनही गप्प आहात ? असेही सचिन नलवडे यांनी पत्रकात नमूद केले आहे.