गुन्हा सिद्ध झाला नसला तरी भुजबळांना तुरुंगात ठेवणे म्हणजे गुन्हाच – प्रकाश आंबेडकर

पुणे : बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून तुरुंगात बंधिस्त असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या बाजूने आता भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरही मैदानात उतरले आहेत. आतापर्यंतच्या चौकशीत छगन भुजबळ यांच्या बाबत कुठलीही ठोस माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे गुन्हा सिद्ध झाला नसला तरी भुजबळांना तुरुंगात ठेवणे म्हणजे गुन्हाच असल्याचे मत आंबेडकर यांनी व्यक्त केले.

प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना छगन भुजबळ यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले की, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छगन भुजबळ यांना चौकशीसाठी अटक केली. मात्र चौकशीत काहीही निष्पन्न झाले नाही. गेल्या दोन वर्षापासून त्यांना सोडण्यात आले नसून त्यांची पुन्हा चौकशी करण्यात यावी, यासाठी तपास यंत्रणेने न्यायालयाकडे वेळ मागितला. मात्र, चौकशीत छगन भुजबळ यांच्याविरोधात ठोस माहिती पुढे आलेली नाही. तरी देखील, भुजबळ यांना तुरुंगात ठेवणे हा एकप्रकारचा गुन्हाच आहे, असे ते म्हणालेत. कोणीही चौकशीत दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले की, धनगर समाजाला मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत आरक्षण दिले जाईल, अशी घोषणा विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधाऱ्यांनी केली होती. मात्र अद्यापपर्यंत त्यावर निर्णय झाला नसून त्या विरोधात २० मे रोजी पंढरपूरमध्ये भव्य परिषद घेऊन जाहीर भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘संविधान बदलले पाहिजे’ या सरसंघचालकाच्या वक्तव्याचे मोदींंनी कुठल्याही प्रकारचे खंडन केले नाही. त्यामुळे बाबासाहेबांच्या नावाने राजकारण करणे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नौटंकी अाहे. दोन दिवसांपूर्वी छत्तीसगड येथे मोदींनी बाबासाहेबांमुळेच आपण पंतप्रधान होऊ शकलो, असे म्हटले होते. दरम्यान, सरसंघचालक खोटारडे असून त्यांच्याविषयी आपल्याला काहीच बोलायचे नसल्याचेही प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले.