‘जो राष्ट्रगीत म्हणणार नाही, तो पाकिस्तानला जाऊ शकतो’

जयपूर : सध्या भारतात चित्रपटगृहात राष्ट्रगीत लावावे की नाही या विषयावर सर्वच क्षेत्रातील लोक आपले मत मांडताना दिसत आहे. यातच जयपूर येथील महापौर अशोक लाहोटी यांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन आदेश काढले आहे. या आदेशानुसार, महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना दररोज सकाळी आणि संध्यकाळी राष्ट्रगीत म्हणायचे आहे, मात्र, जो कोणी हा आदेश मानणार नाही त्याला महापौर पाकिस्तानला जाण्याचे सांगत आहे.

सोमवारी देण्यात आलेल्या या आदेशाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे सकाळी ९.५० आणि संध्याकाळी ५.५५ वाजता पालिकेचे कर्मचारी राष्ट्रगीत म्हणत आहेत. कर्मचाऱ्यांच्या मनातील राष्ट्रभक्तीची भावना वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे जयपूर महापालिकेने म्हटले आहे.

याचबरोबर, ‘दररोज राष्ट्रगीत म्हटल्यामुळे कार्यालयात काम करण्यासाठी चांगले वातावरण निर्माण होईल. त्याचबरोबर राष्ट्रगीताच्या गायनाने राष्ट्रप्रेमाची भावनादेखील वाढीस लागेल,’ असे जयपूर महापालिकेने कर्मचाऱ्यांसाठी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. आज सकाळी कामाला सुरुवात करण्यापूर्वी पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी पहिले राष्ट्रगीत म्हटले. यावेळी स्वतः महापौर अशोक लाहोटीदेखील कर्मचाऱ्यांसोबत उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले ‘राष्ट्रगीताने दिवसाची चांगली सुरुवात होते. दिवसाची यापेक्षा चांगली सुरुवात असूच शकत नाही. यामुळे सर्वांना सकारात्मक उर्जा मिळते’.