या कारवाईचा भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणाशी संबंध नाही : देवेंद्र फडणवीस

मुंबई : पुण्यातील एल्गार परिषदेत जमावाला भडकावल्याच्या आरोपावरून मुंबई, पुणे आणि नागपुरातील कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पँथरच्या कार्यकर्त्यांच्या घरावर आणि कार्यालयांवर पोलिसांनी छापे मारले आहेत. या सगळ्याचा संबंध भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाशी संबंधित असलेल्या एल्गार परिषदेशी असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे.

यावेळी फडणवीस म्हणाले, हे धाडसत्र एल्गार परिषदेला डोळ्यासमोर ठेवून करण्यात येत नाही. तर, केंद्रीय पातळीवर ही कारवाई सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मंत्रालयात मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राज्यात सुरू असलेल्या धाडसत्राबाबत पत्रकारांनी त्यांना विचारणा केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ही कारवाई केंद्रीय पातळीवरुन होत असल्याचे म्हटले. दरम्यान, धाडसत्रवरुन दलित आणि विविध गटांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्लीतही अशाप्रकारचे छापे टाकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांना संभाजी भिडे यांच्यावर कारवाई होणार का, असा प्रश्न प्रसारमाध्यमांकडून विचारण्यात आला. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात ज्यांच्याविरोधात पुरावे सापडतील त्या सर्वांविरोधात कारवाई केली जाईल. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलताना संभाजी भिडे यांना क्लीन चीट दिली होती. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे सापडले नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. तथापि, गुरुजींविरोधात काही नवे पुरावे आले असून त्याचा तपास करून आठ दिवसांत पुढील कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली होती.

पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषद झाली होती. या परिषदेला गुजरातमधील दलित नेता आणि आमदार जिग्नेश मेवाणी हे उपस्तिथ होते. या एल्गार परिषदेच्या सुरुवातीला कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला सादर केलेल्या गीतातून लोकांना भडकावल्याचा आरोप करण्यात आला. याप्रकरणी ७ जानेवारीला विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या एल्गार परिषदेनंतर दुस-या दिवशी कोरेगाव भीमा येथे दंगल झाली़ ही दंगल घडवून आणण्यात नक्षलवाद्याचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यानंतर १ जानेवारीला कोरेगाव भीमा येथे हिंसाचार उफाळला. त्याच्या निषेधार्थ दलित संघटनांनी ३ जानेवारीला राज्यभरात बंद पुकारला होता. तर, एल्गार परिषदेमुळेच कोरेगाव भीमामध्ये तणाव निर्माण झाल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे