तिहेरी तलाक कायदा आणण्यात कोणतेही राजकारण होऊ नये – शायरा बानो

पुणे: तीन तलाकच्या अमानवीय रुढीतून सुटका करायची असेल तर मुस्लीम समाजातील महिलांनी एकत्र येण्याची गरज आहे. तिहेरी तलाकसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे मुस्लिम महिलांवरील अन्याय, अत्याचार, शोषणाला आळा बसू शकेल. कुप्रथांमधून बाहेर पडण्यासाठी, तसेच नवीन पिढीच्या विकासासाठी तिहेरी तलाकचा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे. मुस्लीम महिलांचे अपार शोषण अनेक दशकांपासून होत आहे. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी कायदा हा एकमेव उपाय आहे. हा कायदा आणण्यात कोणतेही राजकारण होऊ नये.अशी अपेक्षा तिहेरी तलाकविरोधात लढा उभा करणार्‍या शायरा बानोयांनी व्यक्त केली. मुस्लीम सत्यशोधक मंडळातर्फे आयोजित वार्तालापामध्ये त्या बोलत होत्या. शायरा बानो यांचे बंधू अर्शद अली, शकील अहमद आणि मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी या वेळी उपस्थित होते.

यावेळी बानो म्हणाल्या की, ‘तिहेरी तलाकविरोधात न्यायालयात अर्ज केल्यानंतर विविध संघटना, तसेच कुटुंबांचा पाठिंबा मिळाला. पतीने तीन तलाक दिला. त्याविरोधात लढा देण्यासाठी दोघे भाऊ आणि वडील खंबीरपणे पाठिशी उभे राहिले, पण त्यासाठी त्यांना मुस्लीम समाजानेच त्रास दिला, असे शायरा बानो यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, तीन तलाकविरुद्ध न्यायालयाची पायरी चढताना या लढय़ाला एवढे मोठे स्वरूप प्राप्त होईल अशी अपेक्षा नव्हती. अ‍ॅड. बालाजी श्रीनिवासन यांनी एक रुपयाचे मानधन न घेताही माझा खटला चालविला. मुस्लीम महिलांचे अपार शोषण अनेक दशकांपासून होत आहे. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी कायदा हा एकमेव उपाय आहे.

पतीने शायरा यांचा अनेक वेळा गर्भपात केला. तलाक देऊन दुसरे लग्न केले आणि मुलांचा ताबाही स्वत:कडे घेतला. धर्मातील कायदे काय सांगतात याचा विचार न करता आम्ही बहिणीबरोबर हा लढा दिला. त्यावरून ‘तुम्हाला बहिष्कृत केले जाईल’ अशा धमक्याही देण्यात आल्या. पण आपल्या बहिणीला नाही तर किमान पुढच्या पिढीला या लढय़ाचा उपयोग होईल या अपेक्षेने आपण खंबीर राहिल्याचे शायरा बानो यांच्या बंधूंनी सांगितले.