अचानक नोटांची मागणी वाढल्याने चलन तुटवडा : अरुण जेटली

नवी दिल्ली : ‘सध्या देशातील काही भागांमध्ये रोख रकमेचा तुटवडा जाणवत आहे. मात्र, देशात रोख रकमेचे संकट नाही. बाजारात आणि बँकांमध्येही पुरेशा प्रमाणात रोख रक्कम उपलब्ध आहे. काही ठिकाणी नोटांची मागणी अचानक वाढल्यामुळे एटीएममधील रोकड संपली आहे. मात्र, ही परिस्तिथी काहीच काळासाठी राहणार. लवकरच सर्वच काही ठीक होईल,’ असा खुलासा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एटीएममधील खडखडाटावर दिला आहे.

उत्तर प्रदेशसह देशातील ९ राज्यांत रोख रकमेचा तुटवडा जाणवतो आहे. देशातील अनेक एटीएमबाहेर ‘नो कॅशचे बोर्ड’ही लागले आहेत. अचानक एटीएममध्ये पैशांचा तुटवडा निर्माण झाल्याने लोकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सर्वीकडे एटीएममधील रोकड नेमकी गेली कुठे?, असा प्रश्न विचारला जात आहे. या पार्श्वभूमीवर अरुण जेटली यांनी ट्विटरद्वारे नागरिकांना आश्वस्त केलं आहे.

‘मी देशातील रोख रकमेबाबत समस्येचा आढावा घेतला आहे. देशात बाजारात आणि बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड उपलब्ध आहे. काही ठिकाणी रोख रकमेची मागणी अचानक वाढल्याने नोटांचा तुटवडा निर्माण झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे,’असे जेटली यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

‘रिझर्व्ह बँकेकडे सध्या १ लाख २५ हजार कोटींची रोकड उपलब्ध आहे. परंतु विषम परिस्थिती निर्माण झाल्याने काही राज्यांत अधिक रोकड आणि काही राज्यांत तुटवडा निर्माण झाला आहे. ही समस्या सोडविण्यासाठी सरकारनं राज्यनिहाय समित्या स्थापन केल्या असून रिझर्व्ह बँकेनंही एक समिती स्थापन केली आहे. राज्या-राज्यांमध्ये रोख रकमेचं आदान-प्रदान व्हावं यासाठी या समित्या महत्त्वाची भूमिका पार पाडतील, असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी सांगितले. तसेच, रोख रकमेची कमतरता असलेल्या भागांमध्ये पुढील तीन दिवसांमध्ये नोटांचा पुरवठा केला जाईल, असंही त्यांनी सांगितले.