कर्नाटकात मिळालेला विजय मोदींमुळे नव्हे तर कानडी जनतेमुळे – उद्धव ठाकरे

मुंबई : नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय राजकारणात नसतांनाही कर्नाटकात भाजपाची बहुमतात सत्ता होती. मात्र, यंदा काँग्रेसला धुडकावून लावत कर्नाटकच्या जनतेने पुन्हा भाजपाच्या झोळीत मतं टाकली असली तरी त्यांना येथे बहुमत प्राप्त करता आले नाही, म्हणूनच ही मोदी लाट नव्हती तर कानडी जनतेची लाट होती, अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामानातील अग्रलेखातून भाजपाला उद्देशून दिली आहे. कर्नाटक निवडणूकीच्या विजयात मोदींचा उगाचच उदोउदो केला जात असल्याची टीकाहीउद्धव ठाकरे यांनी याच माध्यमातून केली आहे.

आजचा सामना संपादकीय…..

कर्नाटकाच्या विजयानंतर भाजपाने देशातील २१ राज्ये जिंकली आहेत. मात्र, भाजपाची बहुमताची सत्ता असणारे कर्नाटक हे १६ वे राज्य आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण सोळाव वरीस धोक्याचं या म्हणी प्रमाणे भाजपालाही हा १६वा विजय धोक्याचा ठरु शकतो. कारण, अद्याच येथे सत्ता कोण स्थापन करते हे स्पष्ट झालेले नाही. आली लहर केला कहर हे कानडी जनतेने दाखवून दिले आहे, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

मावळत्या विधानसभेत भाजपचे ४० आमदार होते. त्यामुळे त्यांचे साठच्या आसपास आमदार वाढले तर काँग्रेसच्या जागा घटल्या. निवडणुकीत कुठल्याही सरकारविरुद्ध वातावरण हे निर्माण होतच असते. शेवटच्या काळात काँग्रेसने जे धर्माचे राजकारण केले त्याचा त्यांना फटका बसल्याचा निष्कर्ष शिवसेनेने काढला आहे. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने स्वतंत्र लिंगायत धर्माचे राजकारण केले. हिंदू विरुद्ध लिंगायत अशी दुफळी माजवून राजकीय फायद्याचे गणित मांडले, मात्र ते साफ चुकले. त्यामुळे लिंगायत समाजाचे प्राबल्य असलेल्या सर्व भागांतून भाजपाला यश मिळाले. काँग्रेसचे हे राजकारण लिंगायत समाजानेच पायाखाली तुडवले. सिद्धरामय्यांचा हा जुगार आणि अतिआत्मविश्वासच त्यांना नडला. त्यांनी मेहनत घेतली मात्र, त्यांची प्रचाराची दिशा चुकल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे.

काँग्रेससाठी अनुकूल वातावरण असतानाही कर्नाटकच्या जनतेने भाजपाला मतं दिली. मात्र, मतांची टक्केवारी पाहता काँग्रेसचा आकडा कमी झाला असला तरी त्यांच्या मतांची टक्केवारी घटलेली नाही. उलट भाजपाला मोठा विजय मिळवूनही त्यांच्या मतांच्या टक्केवारीत वाढ झालेली नाही. त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्याने भाजपासाठी सत्तेची हंडी अद्याप लटकलेलीच आहे. त्यात काँग्रेसने जनता दलाला पाठींबा देऊन ही हंडी आणखीनच उंच नेऊन ठेवली आहे. भाजपाची ही बिनभरवशाही लोकशाही असल्याने वेगळे चित्र घडल्यास आश्चर्य वाटायला नको. असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.