विधिमंडळ हीच सर्वोच्च संस्था – उपसचिव सतीश थिटे

नागपूर : विधिमंडळात पारीत होणारा राज्याचा अर्थसंकल्प, लोककल्याणकारी कायदे आणि नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शासनाची असली तरी शासन आणि प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याचे काम विधिमंडळ करीत असते. त्यामुळे विधिमंडळ हीच सर्वोच्च संस्था असल्याचे प्रतिपादन विधिमंडळ सचिवालयाचे उपसचिव सतीश थिटे यांनी आज येथे केले.

विधानभवन येथे वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र यांच्या वतीने प्रिमिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र टाइम्स नागपूर आवृत्तीचे संपादक श्रीपाद अपराजित, वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने, प्रिमिअर अकॅडमीचे संचालक डॉ. सुरेश जाधव यांच्यासह अधिकारी आणि स्पर्धा परिक्षेतील विद्यार्थी उपस्थित होते.

विधिमंडळाचे कामकाज, रचना आणि कार्यपध्दती सांगत श्री. थिटे पुढे म्हणाले, विधिमंडळाने मान्यता दिलेले अर्थसंकल्प, कायदे आणि नियमांची अंमलबजावणी शेवटच्या घटकापर्यंत होत आहे की नाही, यावर निगरानी ठेवण्यासाठी विधीमंडळाच्या 35 समित्या कार्यरत असतात. या समित्या एकमेकांशी सुसंगतपणे काम करीत असतात. या समित्यांमध्ये सत्ताधारी पक्षांसह विरोधी पक्षातील आमदारही सदस्य असतात. असे सांगुन या 35 समित्यांचे महत्व त्यांनी सांगितले.

प्रशासन आणि लोक सहभाग या विषयावर बोलताना महाराष्ट्र टाईम्स नागपूर आवृत्तीचे संपादक श्रीपाद अपराजीत म्हणाले की, शासन आणि लोकप्रतिनिधीतील अदृश्य भिंत नष्ट झाली पाहिजे. प्रशासनाने लोककल्याणासाठी आयुधांचा वापर करुन उपक्रम राबविताना लोकसहभागही वाढविणे गरजेचे आहे. नुकताच शासनाने तीन वर्षात 50 कोटी वृक्षलागवडीचा संकल्प केला आहे. मात्र वृक्ष लावणे सोपे असले तरी, ते जगवणे महत्वाचे आहे. त्यासाठी प्रशासनाने केआरए पध्दतीनुसार योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. वॉटरकप स्पर्धा हे प्रशासन आणि लोकसहभागाचे उत्तम उदाहरण असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले. समृध्दी महामार्गाच्या भूसंपादनाचे उदाहरण देत एखाद्या प्रकल्पामुळे बाधीत लोकांचे पुनर्वसन हे लोकसहभागातूनच शक्य आहे. सद्सद विवेक हा प्रशासन आणि लोकसहभागाचा दुवा असून प्रशासनाने नेहमी प्रवाहित राहणे गरजेचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

संसद आणि विधिमंडळाची वाटचाल या विषयावर बोलताना यावेळी श्री. मदाने यांनी 1951 नंतरचा इतिहास, आणिबाणीतील आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडी, निवडणुका, प्रसार माध्यमातील भूमिका, देशाची वित्तीय स्थिती,परराष्ट्र धोरण, विदेशी गुंतवणूक आणि शेजारील देशांसोबतचे युध्द आणि व्यवहार याविषयी सविस्तर माहिती दिली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धा परिक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्माचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देवुन गौरव करण्यात आला. तर डॉ.सुरेश जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.

कायद्याची अंमलबजावणी करणे प्रशासनाची जबाबदारी

राज्य सरकार अनेक योजना जाहीर करते मात्र त्याची अंमलबजावणी आणि परिणाम दिसत नाही असा प्रश्न अभ्यासवर्गातील प्रश्नोत्तरादरम्यान एका विद्यार्थ्यांने उपस्थित केला असता त्याला उत्तर देताना श्री. थिटे यांनी लखिना पॅटर्न आणि पाणंद रस्त्याच्या लातूर पॅटर्नचे उदाहरण देत विधिमंडळ हे कायदे करते त्याची अंमलबजावणी करणे प्रशासनाची जबाबदारी असते. राज्यात प्रशासनाची यंत्रणा उपलब्ध आहे. मात्र शासनाची कुठलीही योजना, उपक्रम किंवा धोरणांच्या अंमलबजावणीची जबाबदारी प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ओळखायला हवी असेही त्यांनी उत्तरात सांगितले.