‘एक्झिट पोल’चे शास्त्र अद्याप अपूर्णच

भारतात दरवर्षी कुठल्या ना कुठल्या राज्यात निवडणुका होत असल्यामुळे मतदानपूर्व व मतदानोत्तर चाचण्या घेणा-या संस्थांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. निवडणुका राष्ट्रीय असोत किंवा राज्यस्तरीय, प्रसार माध्यमांमुळे त्यांची राष्ट्रीय व काही बाबतीत तर आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जात असल्यामुळे या चाचण्यांना कमालीचे महत्व आले आहे.

भारतात १९७७ सालापासून या चाचण्यांच्या प्रयोगास प्रारंभ झाल्याचे सांगण्यात येते. परंतु या चाचण्यांच्या प्रयोगाला व निवडणूक निकालांच्या विश्लेषणाला शास्त्रीय परिमाण लाभले ते ज्येष्ठ पत्रकार प्रणव राय यांच्या नेतृत्वाखालील चमूमुळे. सर्वेक्षणाला ठराविक निकष लावून विश्वासार्ह निष्कर्ष काढण्याच्या त्यांच्या प्रयोगाची पुढील काळात मोठी वाहवा झाली.

‘सेफॉलॉजी’ हे शास्त्र तेव्हापासून ख-या अर्थाने लोकपरिचित झाले. नंतरच्या २५-३० वर्षांत प्रसार माध्यमांचा व विशेषतः इलेक्ट्रॉनिक वृत्त वाहिन्यांची संख्या भरमसाठ वेगाने वाढल्यामुळे आणि त्यांच्यातील अतिस्पर्धेमुळे मतदानपूर्व चाचण्या (ओपिनियन पोल) आणि मतदानोत्तर चाचण्या (एक्झिट पोल) यांना अनन्यसाधारण महत्व आले आहे. या चाचण्या करणारे सर्वेक्षक निवडणूक काळात संबंधित क्षेत्रात जाऊन जनमनाचा कानोसा घेतात व त्यांच्या आधारे निकालाचे निष्कर्ष काढले जातात. वृत्तपत्रे व वाहिन्या त्यांची सेवा घेऊन हे निष्कर्ष वाचकांपर्यंत, प्रेक्षकापर्यंत पोहचवितात.

वाचकसंख्या वाढावी, प्रेक्षकसंख्या वाढावी हे त्यामागचे गणीत असते. भारतातच नव्हे तर युरोप, अमेरिकेतही या चाचण्यांना अतोनात महत्व आले आहे मात्र त्यांच्या निष्कर्षांबाबत जनतेत मतभिन्नता आढळते.

कर्नाटकात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी झालेल्या मतदानोत्तर चाचण्यांबाबतही असेच चित्र दिसले. टाइम्स, टाइम्स नाऊ, एबीपी न्यूज, इंडिया टुडे, न्यूज नेशन, एनडीटीव्ही या वृत्तपत्रांनी व वाहिन्यांनी चाणक्य, व्हीएमआर, अँक्सिस व सी व्होटर आदी सर्वेक्षक संस्थांची मदत घेऊन निष्कर्ष प्रसिद्ध केले पण त्यात बरीच तफावत आढळली. ७० टक्क्यांवर मतदान झालेल्या कर्नाटकाचा कौल काँग्रेसच्या बाजूने असेल असा अंदाज इंडिया टुडे-अँक्सिस, टाइम्स नाऊ, सुवर्णा वृत्तवाहिनी यांनी व्यक्त केला होता. काँग्रेसला ९० ते ११८ जागा मिळतील असे सरासरी भाकित त्यांनी केले. तर न्यूज एक्स-सीएनक्स, एबीपी-सी व्होटर, रिपब्लिक टीव्ही, न्यूज नेशन यांनी भाजपच्या बाजूने जनतेचा कल असल्याचे सांगत त्याला सरासरी ९५ ते ११४ जागा दिल्या. काही चाचण्यांमध्ये काँग्रेसचे पारडे जड असल्याचे तर काहींद्वारे भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल असे म्हटले होते. सोमवारी लागलेल्या निकालानुसार भाजप १०४ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला तर काँग्रेस ७८ व जनता दल(सेक्युलर)ला ३७ जागांवर समाधान मानावे लागले. एकंदरीत कर्नाटकात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल हा सर्वाधिक चाचण्यांमधून व्यक्त झालेला अंदाज खरा ठरला आहे.

या निवडणुकीचा निकाल मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजानुसार लागला तर जनता दल (धर्मनिरपेक्ष) या पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरेल व तो पक्ष ‘किंगमेकर’ची भूमिका साकारू शकतो हेही ही भाकित तंतोतंत खरे ठरले. सोमवारी लागलेल्या निकालानंतर ते स्पष्ट झालेच खेरीज कोणाचे निष्कर्ष खरे ठरले व कोणाचे चुकले हेही स्पष्ट झाले. वर उल्लेखीत संस्थांशिवाय आणखीही काहींनी सर्वेक्षण करून त्यांचे निष्कर्ष काढले असतील पण उपरोक्त निष्कर्षांचा वेध घेतला तरी ‘एक्झिट पोल’चे शास्त्र पूर्णपणे विश्वासार्ह वाटावे एवढे विकसित झाले आहे असे म्हणता येत नाही.

अर्थात ही परिस्थिती प्रगत देशातही आहे. डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष म्हणून निवडून येतील असे अमेरिकेत कोणालाही अगदी सर्वेक्षकांनाही वाटले नव्हते. कारण तेथील ग्रामीण क्षेत्रात राहणा-या मतदारांच्या मनाचा कानोसाच कोणी घेतला नव्हता. तीच गोष्ट ‘ब्रेक्झीट’ची. ब्रिटनने युरोपीय समुदायातून बाहेर पडावे ही बहुसंख्य इंग्लंडवासीयांची इच्छा असेल याचा तेथील राज्यकर्त्यांना, विरोधकांना वा पाहणीकर्त्यांनाही अंदाज आला नव्हता.

चंद्रशेखर जोशी