कर्नाटकमध्ये लागणारे निकाल हा जनमताचा कौल : देवेंद्र फडणवीस

मुंबई : कर्नाटकमध्ये लागणारे निकाल हा जनमताचा कौल आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. तसेच, कर्नाटक येथील निवडणुकीत भाजपाला मिळालेले यश हे आगामी २०१९ च्या निवडणुकांमध्ये भाजपासह, एनडीएला मिळणाऱ्या यशाचे प्रतीक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यामुळेच भाजपाला कर्नाटकात मोठे यश मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या मनात आशेची लाट निर्माण केली, या लाटेचे रुपांतर विश्वासाच्या लाटेत झाले आहे त्याचाच हा परिणाम आहे असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. २०१४ मध्ये जनतेने भाजपासह एनडीएला कौल दिला. याचबरोबर, २०१९च्या निवडणुकीत सुद्धा अशाच प्रकारचे भरघोस मतदान केले जाईल याची खात्री वाटते असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच, कर्नाटकाचे यश म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा विजय आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच बी. एस. येडियुरप्पा यांचे त्यांनी आभारही मानले आहेत.