सुशांत माळवदेंवर हल्ला करणाऱ्या फेरीवाल्याना मनसेने पकडले

मुंबई: मालाडमध्ये मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोन फेरीवाल्यांना भाईंदरमधून अटक करण्यात आली. गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना मनसे कार्यकर्त्यांनी दोघांना पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. मालाडमध्ये सुशांत माळवदेंवर हल्ला करणारे दोन फेरीवाले भाईंदरमध्ये लपून बसले होते. मनसे कार्यकर्त्यांनी या दोघांना पकडून पोलिसांच्या हवाली केले. हे दोघेही पळून जाण्याच्या तयारीत होते, असे समजते.

एल्फिन्स्टन रोड पुलावरील दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक पवित्रा घेतला असतानाच शनिवारी मालाडमध्ये फेरीवाल्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे गंभीर जखमी झाले होते. फेरीवाल्यांनी रॉडने सुशांत माळवदे यांच्यावर हल्ला केला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन सुशांत माळवदे यांची भेट घेतली होती. सुशांत माळवदे मारहाण प्रकरणी 7 फेरीवाल्यांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील पाच जणांना मालाड पोलिसांनी अटक केली होती. तर दोन जण पसार झाले होते.

हल्ल्यानंतर मनसे आणि संजय निरुपम यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. निरुपम यांनी चिथावणी दिल्यानेच फेरीवाल्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप मनसेने केला होता. तर माळवदेंसह मनसेचे गुंड फेरीवाल्यांवर चाल करुन आले. प्रतिकार व स्वसंरक्षण करताना हातघाई घडली, असे निरुपम यांनी म्हटले होते.