गणेशोत्सवात थर्माकोल वापरण्याबाबतची याचिका उच्चन्यायालयाने फेटाळली

मुंबई : दरवर्षी गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात थर्माकोलचा वापर केला जातो. तर दरवर्षीप्रमाणेच या वर्षीही गणेशोत्सवामध्ये सजावटीसाठी थर्माकोल वापरू द्यावे, अशी याचिका थर्माकोल फॅब्रिकेटर अँड डेकोरेटर असोसिएशनकडून करण्यात आली होती. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर आज या याचिकेवर सुनावणी झाली.

गणेशोत्सवासाठी थर्माकोलची खरेदी काही महिन्यांपूर्वीच केली जाते. मखर तयार करण्याकरिता घाऊक विक्रेते खूप आधीपासूनच थर्माकोलची खरेदी करतात. मखर कलाकारांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक यापूर्वीच केली आहे. पण, थर्माकोल बंदी झाल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, असे असोसिएशनकडून सांगण्यात आले आहे.

गणेशोत्सवानंतर दहा दिवसांच्या आत थर्माकोलचा मखर परत केल्यास पाच टक्के रक्कम परत केली जाईल. उत्पादकांनीही प्रदूषण न करता थर्माकोलची विल्हेवाट लावण्याचे आश्वासन दिले आहे. यासर्वाचा विचार करता गणेशोत्सवामध्ये थर्माकोल वापरू द्यावे, असे थर्माकोल फॅब्रिकेटर अँड डेकोरेटर असोसिएशनकडून उच्च न्यायालयाला याचिकेद्वारे सांगण्यात आले. असोसिएशनच्या याचिकेवर पर्यावरणाला हानिकारक असलेल्या गोष्टींना परवानगी देणे शक्य नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. प्लास्टिक आणि थर्माकोल यासारख्या वस्तूंची विल्हेवाट लावण्यासाठी पुरेसा वेळ दिलेला आहे, असेही न्यायालयाने सांगितले.