डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन

अमरावती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७व्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. अमरावती विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे हे प्रदर्शन भरविण्यात आले. याचे उद्घाटन पालकमंत्री प्रवीण पोटे व कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात बाबासाहेबांच्या सामाजिक व राजकीय जीवनातील छायाचित्रांचा समावेश करण्यात आला आहे. आपल्या सामाजिक जीवनात त्यांनी केलेल्या विविध कार्याच्या आठवणींच्या छायाचित्रांचाही समावेश आहे. दीक्षा ग्रहण करतानाचे तसेच जुन्या राजकीय नेत्यांसोबत चर्चा करतानांची छायाचित्रेही येथे पाहायला मिळत आहेत.

ही सर्व छायाचित्र १९४५ ते १९५५ या दहा वर्षांतील आहेत. समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, अर्थकारण या विषयांवरील अनेक दुर्मीळ छायाचित्र या प्रदर्शनात लावण्यात आली आहेत. या प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.