विवाह समारंभात जमावाच्या मारहाणीत मजुराचा मृत्यू

नलबारी/गुवाहटी: जमावाच्या मारहाणीची ही महिनाभरातील दुसरी घटना असून गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. विवाहा निमित्त फोडण्यात येणाऱ्या फटाक्‍याला विरोध करणाऱ्या एका व्यक्तीचा जमावाकडून मारहाण केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची ही घटना घडली आहे. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. जतिन दास (वय 35) असे त्या मृत मजुराचे नाव असून,तो घोराथल गावचा रहिवासी आहे.

वधूच्या घरी बुधवारी रात्री वराचे आगमन झाल्याने वऱ्हाडी मंडळीकडून फटाके फोडले जात होते. मात्र, फटाक्‍याचे काही तुकडे दास यांच्या अंगावर उडाले. त्यांनी फटाके फोडण्याचा विरोध केला असता विवाहातील वऱ्हाडी मंडळीतील
काही जणांनी त्याला माराहण केली. गंभीर जखमी झालेल्या दास यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून वऱ्हाडी मंडळींना ताब्यात घेतले आणि विवाह समारंभास मनाई केली आहे.