तोडफोड प्रकरणात अटकेत असलेले नगरसेवक गिरवले यांचा मृत्यू

अहमदनगर : केडगाव येथील हत्याकांडानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला केल्याप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले मनसेचे ज्येष्ठ कार्यकर्ते, महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक कैलास रामभाऊ गिरवले (वय ५५) यांचे पुण्यात उपचारादरम्यान सोमवारी रात्री निधन झाले.

केडगाव येथे शिवसैनिकांच्या हत्याप्रकरणात राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना अटक झाली होती. त्यानंतर काही नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला चढवत कार्यलयाची मोठ्याप्रमाणात तोडफोड केली होती. त्यामुळे तोडफोडीच्या या गुन्ह्यात गिरवले यांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी गिरवले न्यायालयीन कोठडीत असताना त्यांना कोतवाली पोलीस ठाण्यातील दुस-या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले. या गुन्ह्यात त्यांना रविवारी न्यायालयीन कोठडीची मंजुरी मिळाली होती. त्यानंतर त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे गिरवले यांना उपचारासाठी प्रथम जिल्हा रूग्णालय व नंतर पुणे येथील ससूण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

गिरवले यांना रविवारी दिवसभर कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले होते. मात्र सायंकाळी त्यांची प्रकृती ढासळली आणि अधिकच चिंताजनक बनली. आणि रात्री उशीरा त्यांच निधन झालं.