२०२५ मध्ये देशाचे सकल उत्पन्न होणार ५ ट्रिलियन डॉलर – राष्ट्रपती

मुंबई : सेवा क्षेत्र आणि तंत्रज्ञानाच्या समन्वयातून भारताचे सकल घरेलू उत्पन्न २०२५ मध्ये पाच ट्रिलियन डॉलर इतके होऊ शकते, असा विश्वास व्यक्त करीत त्यामध्ये सेवा क्षेत्राचा वाटा तीन ट्रिलियन डॉलर इतका असेल. रोजगार, उत्पादकता आणि नाविन्यता या क्षेत्रात सेवांचे प्राबल्य आहे. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वेगामुळे सेवा क्षेत्राचे योगदान शेती, उत्पादन क्षेत्र आणि सुविधा क्षेत्रासाठी महत्त्वाचे ठरले आहे. ‘सेवा क्षेत्र’ हे २१ व्या शतकातील जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा आहे. बारा सर्वोत्कृष्ट सेवा क्षेत्राची सुरुवात हे एक धाडसी पाऊल आहे, त्यामुळे भारताची आणि जगाची अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. भारतीय सेवांचे क्षेत्र वाढून त्या जागतिक सेवा क्षेत्रात आपले स्थान निर्माण करतील, असा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज येथे व्यक्त केला.

गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये केंद्रीय वाणिज्य विभाग व महाराष्ट्र शासनातर्फे चौथे सेवांविषयक जागतिक प्रदर्शन आणि १२ सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय सेवा क्षेत्रांचा शुभारंभ राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद, महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू, वाणिज्य विभागाच्या सचिव रिटा टिओटिया यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रपती यावेळी म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी अभिनंदन करतो. त्यांनी या उपक्रमाचे सहयजमानपद भूषविले. देशाच्या आर्थिक आणि गुंतवणूक क्षेत्रात महाराष्ट्राची भूमिका महत्वाची आहे. महाराष्ट्राला मजबूत उद्योगांचा पाया असून आता वाढत्या सेवा क्षेत्रामुळे ते उद्योग क्षेत्राला अधिक पूरक ठरले आहे. भारतात, सेवा
क्षेत्राचे योगदान सकल मूल्याच्या ६१ टक्के आहे. तरुण लोकसंख्या, तंत्रज्ञानाशी जुळवून घेणारे हुशार तंत्रज्ञ यामुळे भारत जगात एका वैशिष्ट्यपूर्ण स्थितीत आहे. जगाला सेवा पुरविण्याच्या स्थितीत आज भारत येऊन पोहोचला आहे. २०१६ मध्ये भारताची जागतिक सेवा निर्यात ३.४ टक्के होती. २०२२ पर्यंत हे प्रमाण ४.२ टक्क्यांवर जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.