सत्ताधारी भाजपा नगरसेवकांचा आयुक्तांविरुद्धचा अविश्वास ठराव मुख्यमंत्र्यांनी फेटाळला

पनवेल : पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांच्याविरोधात पनवेल महापालिकेतल्या सत्ताधारी भाजपाने 26 मार्च रोजी आणलेला अविश्वास प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी फेटाळत भाजपाच्याच आमदारांना आणि नगरसेवकांना दणका दिला.

भ्रष्टाचार करणे, हुकूमशाहीने वागणे, प्रशासनावर अंकुश न ठेवणं, जनतेमध्ये रोष निर्माण करणे असे आरोप सुधाकर शिंदे यांच्यावर करण्यात आले. याप्रकरणी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजपाच्या नगरसेवकांसह हा ठराव संमत करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती. तर शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी विरोधात असलेल्या शेकापच्या नगरसेवकांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.

सत्ताधारी भाजपाचाच प्रस्ताव फेटाळताना सरकारने आयुक्त सुधाकर शिंदे यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. आयुक्तांनी कोणताही भ्रष्टाचार केला नसून महापालिकेचं आर्थिक नुकसान केले नसल्याचे मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या नगरविकास विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे. हा एकप्रकारे पनवेलमधील भाजपाला आणि आमदार प्रशांत ठाकूर यांना दणका मानला जात आहे.