भाजपाला विजयासाठी शुभेच्छा; मात्र पुढल्या निवडणुका मतपत्रिकेने करा; उद्धव ठाकरे

मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेली कर्नाटक विधानसभेत कुठला पक्ष आपला झेंडा फडकवेल हे आता स्पष्ट होतांना दिसत आहे. कर्नाटकात मिळालेल्या यशाबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र शुभेच्छा देत असतांना त्यांनी ईव्हीएम मशीनच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यापुढे होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनचा वापर न करता मतदानाची प्रक्रिया मतपत्रिकेने पूर्ण करावी अशी मागणी केली. आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात त्यांनी दादरच्या शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली असता त्यांनी ही मागणी उचलून धरली.

यावेळी ते म्हणाले की, कर्नाटकाच्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी भरपूर मेहनत केली. मात्र विजय हा जनतेने दिलेल्या मतांमुळेच प्राप्त होऊ शकतो. या निवडणुकीत कर्नाटकातील जनतेनी भाजपावर विश्वास ठेवत त्यांना सत्ता स्थापण्याची संधी दिली आहे. त्यांच्या यशाला मी शुभेच्छा देतो. मात्र कर्नाटकाचा मुख्यमंत्री कुणीही झाला तरी त्यांनी कर्नाटकात असलेल्या मराठी माणसाचा योग्य सन्मान करावा असेही ते म्हणाले.

भाजपाला सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विजय प्राप्त करता येतो. मात्र पोटनिवडणुकीत पराभव स्वीकारावा लागतो हे आजपर्यंतच्या झालेल्या पोटनिवडणुकीत दिसून आले आहे. अशी खोचक टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच यापुढे होणाऱ्या सर्व निवडणुका मतपत्रिकेचा वापर करूनच घेण्यात याव्या अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.