आंदोलकांनी दिल्लीत आंदोलन करावे, यासाठी विमानतिकीटे मी देतो :चंद्रकांत पाटील

कोल्हापूर: शहरातही शिवाजी पुलाच्या प्रश्नांवर आंदोलन करणाऱ्यांनी दिल्लीत पुरात्त्व विभागाच्या कार्यालयासमोर जावून आंदोलन करावे, असे म्हणत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आंदोलकांची खिल्ली उडवली. दिल्लीला जाण्यासाठी आंदोलकांना बिझनेस क्लासची विमानतिकीटे आणि आंदोलनासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपाचा खर्च देवू, असे देखील पाटील म्हणाले.

कोल्हापुरात एका कार्यक्रमासाठी आले असतांना त्यांनी शहरातील शिवाजी पुलावरून सुरु असलेल्या वादावर आपले मत दिले.कोल्हापुरात असलेला शिवाजी पुल हा जुना झाला आहे. त्यावरून वाहतूक करणे धोक्याचे असल्यामुळे गेली अनेक दिवसांपासून कोल्हापूरवासीयांनी तीव्र आंदोलन सुरू केले आहे. सर्व पक्षीय कृती समितीच्यावतीने सुरू असलेल्या आंदोलनातून मार्ग काढण्या ऐवजी आंदोलकांनी दिल्लीला जावे असा विवादास्पद सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला. त्यांना विमानात बिझनेस क्लासमध्ये बसण्याची संधी खूप दिवसांनी मिळेल असेही ते म्हणाले.

पुरातत्व विभागाच्या परवानगीशिवाय शिवाजी पुलाचा प्रश्न मार्गी लागणे अशक्य आहे, इतका साधा मुद्दा शाहु महारांच्या कोल्हापूरातील आंदोलकांच्या लक्षात येत नाही, ही दुर्दैवी गोष्ट असल्याचे पाटीलांनी म्हटले. तसेच, पुरातत्व विभागाच्या परवानगीशिवाय पुलाचे बांधकाम करणे चुकीचे आहे असेही त्यांनी यावेळी म्हटले.