७ वर्षीय चिमुकल्याने फडकावला आफ्रिकेतील सर्वात उंच शिखरावर तिरंगा

हैदराबाद: येथील सात वर्षीय समन्यू पोथूराजूने आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर माऊंट किलिमांजारोवर यशस्वी चढाई करत तिरंगा फडकावला. याचबरोबर, समन्यू किलिमांजरोवर सर्वात कमी वयात यशस्वी चढाई करणारा गिर्यारोहक ठरला आहे. आता त्याला ऑस्ट्रेलियातील शिखरं खुणावू लागली आहेत.

आफ्रिकेच्या टांझानियातील माऊंट किलिमांजारो शिखर सर करणं फार अवघड मानलं जातं. या भागातील तापमान कमीअसते. त्यामुळे पर्वतावर चढाई करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, या सर्व अडचणींवर मात करत समन्यूनं समुद्रसपाटीपासून 5 हजार 895 मीटर उंचीवर असलेले किलिमांजारो शिखर त्याच्या प्रशिक्षकांसोबत सर केले.

यावेळी समन्यूनं सांगितले की, ‘जेव्हा आम्ही चढाई सुरू केली, तेव्हा पाऊस सुरू होता. संपूर्ण वाट दगडांनी भरलेली होती. मी अतिशय घाबरलो होतो. पाय खूप दुखत होते. मात्र मी थोडा वेळ विश्रांती घेतली आणि पुन्हा चढाई सुरू केली. मला बर्फ खूप आवडतो. त्यामुळेच चढाईसाठी किलिमांजारो शिखराची निवड केली,’

समन्यूच्या कामगिरीवर त्याची आई प्रचंड खूष आहे. ‘माझ्या मुलानं विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न केला, याचा मला खूप आनंद आहे. माझी प्रकृती ठीक नसल्यामुळे मी त्याची साथ देऊ शकत नाही. मात्र त्यानं हार न मानता प्रयत्न कायम ठेवले आणि तो यशस्वी झाला,’ अशी प्रतिक्रिया समन्यूच्या आईनं दिली.