आमची नार्को टेस्ट करा; कठुआ बलात्कार आणि हत्येतील आरोपींची मागणी

श्रीनगर : आजपासून श्रीनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुरुवात झाली असून यावेळी आम्हा सर्वांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी मुख्य आरोपी सांझीरामने न्यायालयाला केली. तसंच आम्हाला आरोपपत्र मिळालं नसल्याचंही आरोपींनी न्यायालयाला म्हटले आहे. त्यानंतर न्यायालयाने मग आरोपींच्या वकिलांना आरोपपत्र देण्याचे आदेश पोलिसांना दिले.

बलात्कार आणि हत्या प्रकरणात एकूण आठ आरोपी आहेत. त्यापैकी एक जण अल्पवयीन आहे. त्यामुळे सात आरोपींना सत्र न्यायालयात आणि एका आरोपीला ज्युवेनाईल कोर्टात हजर करण्यात आलं. दरम्यान, आरोपींनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळत, नार्को टेस्टमध्ये सर्व काही सिद्ध होईल, असा दावा केला.

दुसरीकडे पीडितेच्या वकिलांना वारंवार धमकावण्यात येतंय. त्यामुळे हे प्रकरण जम्मू काश्मीर राज्याबाहेरच्या न्यायालयात चालवण्यात यावं अशी याचिका पीडित कुटुंबियांच्या वकिलाने सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. त्याचप्रमाणे पीडित कुटुंबियांना सुरक्षा पुरवण्याची मागणीही केली. याप्रकरणी पुढची सुनावणी २८ एप्रिलला आहे.

दरम्यान, याप्रकरणातील मुख्य आरोपी सांझीरामने आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. सांझीरामच्या मुलीनेही हा कट असल्याचं म्हटलं आहे. तर “पीडित मुलगी ही हिंदू-मुस्लिम नव्हती. तिच्यावर बलात्कार झालेला नाही, तर तिची हत्या झाली आहे. त्याचा तपास सीबीआयने करावा, अन्यथा याप्रकरणात निर्दोष लोक अडकतील”, असा दावा सांझीरामच्या मुलीने केला आहे.