येडियुरप्पांच्या शपथविधीस सुप्रीम कोर्टाचा होकार; काही वेळातच शपथ घेणार

नवी दिल्ली : रात्रभर चाललेल्या मोठ्या नाटकीय घडामोडीनंतर आता काही वेळातच भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार येडियुरप्पा हे कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर, कोर्टाने मध्यरात्री ऐतिहासिक सुनावणी केली. सर्वोच्च न्यायालयाने मध्यरात्री सव्वा दोन ते पहाटे पाचपर्यंत दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर, काँग्रेसची मागणी अमान्य करत भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांच्या शपथविधीला हिरवा कंदिल दाखवला. त्यामुळे बी एस येडियुरप्पा हे कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून आज राजभवनात शपथ घेणार आहेत.

मात्र मध्यरात्रीच्या या ऐतिहासिक घटनानंतरही भाजपचा अडथळा अजून कमी झालेला नाही. कारण कोर्टाने येडियुरप्पांना शपथविधीसाठी हिरवा कंदिल दाखवला असला, तरी आज कोर्टाने कामकाज सुरु होताच समर्थक आमदारांची यादीही मागवली आहे. सकाळी १० वाजेपासून कोर्टाचं कामकाज सुरु होणार आहे. मात्र त्याआधीच शपथविधी होणार असल्याने काँग्रेसकडे याला विरोध करण्यासाठी कुठलाही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. याप्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी सकाळी १०. ३० वा. होणार आहे.

येडियुरप्पांच्या शपथविधीला विरोध करत काँग्रेस-जेडीएसने थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली. राज्यपालांनी येडीयुरप्पांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण देताच काँग्रेसनं रात्री उशिरा सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. कोर्टात रात्री पावणे दोन ते तब्बल पहाटे पाचपर्यंत दोन्ही पक्षांनी आपली बाजू मांडली. एखाद्या पक्षाला सत्तास्थापनेचं निमंत्रण देणं राज्यपालांचा विशेषाधिकार आहे, असं म्हणत कोर्टानं यात हस्तक्षेपास नकार दिला. सुप्रीम कोर्टानं येशपथविधी रोखण्यास स्पष्टपणे नकार दिला. न्या. ए. के. सिक्री, न्या. अशोक भूषण आणि न्या. बोबडे या तीन सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी सुरु आहे.

सुप्रीम कोर्टानं या याचिकेवर दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेत, पुढील सुनावणी उद्या सकाळी 10.30 वाजता ठेवली आहे. त्यामुळे येडियुरप्पांचा आज सकाळी 9 वाजता होणारा शपथविधी सोहळा पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेस नेते आणि वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी काँग्रेस-जेडीएसच्यावतीने खंडपीठासमोर आपली बाजू मांडली. तर भाजपाकडून मुकुल रोहतगी तर केंद्र सरकारच्यावतीनं वकिल तुषार मेहता यांनी सरकारची बाजू मांडली.

दरम्यान शपथविधी रोखण्यास नकार देऊन कोर्टाने भाजपला दिलासा दिला असला तरी भाजपचा मार्ग सुकर झाला असं नाही. कारण, कोर्टानं भाजपकडून समर्थक आमदारांची यादी मागितली आहे. त्याबाबत उद्या पुन्हा साडे दहा वाजता सुनावणी होणार आहे. त्यामुळे भाजप बहुमताचा आकडा कशा पद्धतीनं जुळवणार हा ही एक प्रश्न आहे. कर्नाटकात बहुमताचा आकडा ११२ इतका आहे. मात्र सध्या भाजपकडे १०४ आणि एक अपक्ष असे एकूण १०५ आमदारांचं संख्याबळ आहे.