सुनील तटकरें म्हणाले, तर इथेच विष घेऊन आत्महत्या करीन: सभागृह अवाक्

नागपूर: विरोधकांनी गोंधळ घातल्याने विधान परिषद पहिल्यांदा 35 मिनिटे, दुसऱ्यांदा 10 मिनिटांसाठी आणि तिसऱ्यांदा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली. इयत्ता सहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात सात पाने गुजराती भाषेत छापल्यावरून. विरोधक आक्रमक झाले. सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी, सुनील तटकरेंवर “तुम्हीच जोडून आणली ही पाने’ ,असा आरोप केला. त्यावर तटकरे यांनी “हे मी छापून आणले हे तुम्ही सिद्ध केले तर इथेच विष घेऊन आत्महत्या करीन’, असा इशारा दिला. तटकरे यांच्या वक्तव्यावर संपूर्ण सभागृह अवाक् झाले. त्या नंतर सभापतींनी काम दिवसभरासाठी तहकूब केले.

प्रश्नोत्तराच्या तासानंतर सभागृहात मराठी भाषा समितीचा पहिला अहवाल सादर करण्यात आल्यानंतर सुनील तटकरे यांनी सहावीचे भूगोलाचे पुस्तक सादर करीत महाराष्ट्राचे गुजरातीकरण कधी केले? असा सवाल करीत संताप व्यक्त केला. त्यानंतर विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केल्याने सभागृहाचे कामकाज 35 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. चर्चेदरम्यान सरकार माफी मागीत नाही तोपर्यत सभागृह चालू देणार नाही, असा इशारा अशोक उर्फ भाई जगताप यांनी दिला. तहकूबी नंतर सभागृह सुरू होताच विरोधकांनी परत गुजराथी पानांचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी असे काहीही घडलेले नाही. सातवीच्या भूगोलाच्या पुस्तकात गुजरातीची पाने जोडलेली नाही. ही बाईंडींग मिस्टेक असल्याचे ते म्हणाले. त्यानंतरही विरोधक आक्रमक झाल्याने चंद्रकांतदादांनी “तुम्हीच जोडून आणली ही पाने’ ,असा आरोप केला. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी, सर्व शिक्षा अभियानाचा ठप्पा पुस्तकावर आहे, याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, तुम्ही 1 लाख पुस्तके छापली. श्लोक प्रिंटसिटी, अहमदाबाद यांना छपाईचे काम दिले. गुजरातच्या बाबतीत तुम्हाला किती लाचार व्हायचे ते व्हा. पण महाराष्ट्र लाचार होणार नाही. महाराष्ट्राच्या अस्मितेचा हा प्रश्न आहे. आम्ही हे खपवून घेणार नाही, असे ठणकावून सांगितले. घडले ते विद्यार्थ्यांच्या दृष्टीने घातक आहे. या गोंधळातच सोमवारपर्यत सर्वंकष चौकशी करून शासनाने निवेदन करावे, असे निर्देश सभापतींनी दिले.