ऊसाला पहिली उचल 3400 रुपये द्यावी; खासदार राजू शेट्टींची ऊस परिषदेत मागणी

कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी यंदा साखर कारखान्यांनी शेतकऱयांच्या उसाला प्रति टन 3400 रुपयांचा दर द्यावा, अशी मागणी जयसिंगपूर येथे आयोजित 16 व्या ऊस परिषदेत केली आहे.
खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत या दोन्ही जिवलग मित्रांची मित्रांची जोडी सतत 15 वर्षे होती. यंदा मात्र, त्यांना वगळून ही ऊस परिषद आयोजित करण्यात आली. कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि कर्नाटक राज्यातून हजारो शेतकरी ऊस परिषदेला उपस्थित होते. ऊस परिषदेत 11 ठराव बहुमताने शेतकर्‍यांनी हात उंचावून मंजूर केले.

देशातील शेतकऱयांचा सातबारा कोरा करून त्यांना संपूर्ण कर्जमुक्त करण्यात यावे.तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्यापूर्वी उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे वचन दिले होते,केंद्र सरकारने त्याची त्वरित अमलबजावणी करावी, ज्या साखर कारखान्यांनी शासनाने वारंवार आदेश देऊन ही अद्याप 2016 -17 ची एफआरपी दिलेली नाही त्या कारखान्यांच्या संचालकांवर त्वरित गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात टाकावे. राज्याच्या सर्व साखर कारखान्यांच्या प्रवेश द्वारावर,गोडावून मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सर्व कारखान्यांचे गोडावून आणि वजन काटे ऑनलाईन करण्यात यावेत.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर सीसी टीव्ही फुटेज देण्याचे त्यांना आदेश द्यावेत,राज्य सहकारी बँकेकडून साखर कारखान्यांना देण्यात येणारी कर्जस्वरूपातील उचल 90 टक्के करण्यात यावी, ऊस बिलातून कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये व तसेच मंत्री समितीने भागविकास निधी कपात करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला ही सभा विरोध करत असून राज्याबाहेर घालणेस बंदी म्हणजे आमच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे.हे दोन्ही निर्णय सरकारने त्वरित मागे घ्यावेत अन्यथा सरकारला तीव्र आंदोलनास सामोरे जावे लागेल.आदि 11 मागण्या यावेळी करण्यात आल्यात.