आयुर्वेदिक उपचारासाठी भारतात येणाऱ्या रूग्णांना उत्तम सेवा देण्यासाठी केंद्र शासन कार्यरत- सुधांशू पांडे

मुंबई : हजारो वर्षापासून अस्तित्वात असलेल्या आयुर्वेद शास्त्राचा उद्देश निरोगी नागरिक तयार करणे आहे. आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी जगभरातून रूग्ण भारतात येतात. त्यांना अधिकाधिक उत्तम दर्जाच्या सुविधा देण्यासंदर्भात आणि त्यांना भारतात येण्यासाठीचे अडथळे दूर करण्यासाठी वाणिज्य, उद्योग विभाग व आयुष मंत्रालय एकत्रितरित्या उपाययोजना करीत आहेत, असे वाणिज्य आणि उद्योग विभागाचे सहसचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले.

भारतातील आयुर्वेद क्षेत्रातील गुंतवणूक आणि वैद्यकीय सेवा प्रवास मूल्य या विषयावर सेवाविषयक जागतिक प्रदर्शनात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. पांडे बोलत होते. यावेळी आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा आदिसह विविध आयुर्वेदिक रूग्णालय, संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

वैज्ञानिक आयुर्वेदाचा वापर जगातील वैद्यकिय क्षेत्रात करताना, आयुर्वेदिक सेवा जगभर पोहोचविण्यात येणारे अडथळे या विषयावर पहिल्या सत्रात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

यानंतर भारतातील आयुर्वेदाची माहिती, भारतात आयुर्वेदिक रूग्णालय, सेवा केंद्र सुरू करण्यासाठी असलेल्या संधी तसेच, आयुर्वेद क्षेत्रातील गुंतवणूक या विषयावर भागधारक आणि तज्ज्ञांनी आपली मते मांडली.

श्री. पांडे म्हणाले, परदेशात इतर वैद्यकीय उपचार घेताना आर्थिकदृष्ट्या खुपच महाग असते आणि दीर्घकाळ पुन्हा पुन्हा उपचार घ्यावे लागतात. मात्र भारतात आयुर्वेद या एका उपचार पद्धतीत कमी खर्चात तुम्ही उपचार करू शकतात. आयुर्वेदासंदर्भातील सर्व शिक्षणक्रम विद्यापीठाअंतर्गतच सुरू रहावेत आणि त्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू असल्याचेही श्री. पांडे यांनी सांगितले.

वैद्य श्री. कोटेचा म्हणाले, भारतात आयुर्वेदिक उपचारासाठी दरवर्षी 2 दशलक्ष रूग्ण येतात. 3 हजार 500 रूग्णालय आणि 26 हजार डिस्पेन्सरी आहेत. आयुष्मान भारत योजना शासनामार्फत राबविण्यात येते. सर्जरी पेक्षा आयुर्वेद उपचार योग्य असल्याचे जागतिकस्तरावर मान्य करण्यात आले आहे. यामुळे दर्जात्मक आरोग्य असलेले आयुष्य जगता येते.

कार्यक्रमास आयुर्वेद रुग्णालयाचे चेअरमन राजीव वासुदेवन, धात्री आयुर्वेदचे चेअरमन डॉ. संजयकुमार, कैराली आयुर्वेदिक ग्रुपचे अभिषेक रमेश, अभिक मोईत्रा आदी उपस्थित होते.