लिंबाच्या शेतीतून शेतकऱ्याला मिळणार साडेतीन लाखांचे उत्पन्न

अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील माहुली चोर या गावचा विकास सरोदे नावाच्या तरूण शेतकऱ्याने कमी खर्चात वर्षभर मागणी असणारे आणि ताजे उत्पन्न देणारे पीक म्हणजे लिंबाची लागवड केली आहे. विकास सरोदे यांची एकूण ८ एकर शेती आहे.

त्यापैकी त्यांनी ३ एकरमध्ये कागदी लिंबाची बाग फुलवली. २०११ साली त्यांनी या शेतात या लिंबाची लागवड केली. त्यासाठी त्यांना ८ हजार रुपये खर्च आला. त्यानंतर सरोदे यांनी याच बागेत आंतर पीक घेतले. साधारणतः ६ वर्ष झाल्यानंतर झाडांना लिंबू यायला सुरुवात झाली. लिंबू बाग विकसित केल्यानंतर लिंबाचे उत्पादन वाढवायचे, त्याचा दर्जा वाढवायचा, मार्केट अधिक मिळवायचे हे त्यांचे उद्दीष्ट होते. त्यामुळे सरोदे यांनी विदर्भातील अनेक लिंबू बागांना भेट देऊन पाहणीही केली.

अंबिया बहार जानेवारीत धरून फळे एप्रिल-मे मध्ये सुरू होतात. दोन्ही हंगांमांचे चार महिने धरले तरी जानेवारी ते ऑगस्ट असे सलग आठ महिने लिंबाचे उत्पादन व उत्पन्न सुरू राहते. या उन्हाळ्यात सरोदे यांना ७०० ते ८०० कट्टे उत्पन्न होणार असून खर्च वजा जाता निवळ उत्पन्न साडेतीन लाख रुपये मिळणार आहे.