ओबीसींच्या लढ्यासाठी भुजबळांसह कुणासोबतही जाऊ शकतो : खडसे

नवी दिल्ली : माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे म्हणाले, ओबीसी समाजाच्या लढ्यासाठी भविष्यात माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांसह कुणासोबतही एकत्र येईल आणि यात काहीही गैर नाही.
एका वृत्त वाहिनीशी बोलताना खडसे म्हणाले, अंजली दमानिया यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. या बेछुट आरोपांमुळे माझी राजकीय कारकीर्द बदनाम करून वाया घालवली. माझ्यावर नको ते आरोप करण्यात आले. पण हाती काहीही लागले नाही. हे सर्व करण्यामागे भाजपच्या मंत्र्यांचा हात आहे, अशी माहिती कल्पना इनामदार यांनी न्यायाधीशांसमोर जबाब नोंदवताना दिली आहे. याची चौकशी व्हावी अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली

गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसी समाजाचे नेतृत्व केले होते परंतु गेल्या काही वर्षांपासून ओबीसी समाजासाठी नेतृत्व करण्यात खंड पडला. त्यांच्या जाण्यानंतर छगन भुजबळ यांनी नेतृत्व सांभाळले. पण छगन भुजबळ जेलमध्ये गेल्यामुळे दोन वर्ष ओबीसी समाजात नाराजीचे वातावरण पसरले होते. आता भुजबळ जेल बाहेर आले असल्यामुळे ओबीसी समाजात उत्साहाचे वातावरण आहे. ओबीसींवर अन्याय होत असल्याची सार्वत्रिक भावना असल्याचे परखड मत खडसेंनी व्यक्त केले.